

Badlapur Vangani Station Central Railway Local Train Update
बदलापूर : मध्य रेल्वेच्या वांगणी ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान कर्जतकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे आज (दि. ३०) सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी साडेसहाच्या दरम्यान बदलापूर वरून खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या गाडी पास होण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर कर्जत दिशेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.
गेल्या पाऊण तासांपासून बदलापूर वरून कर्जतच्या दिशेने एकही गाडी गेली नाही. बदलापूरतून 7 वाजून 10 मिनिटांनी कर्जतच्या दिशेने जाणारी एक लोकल बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत येऊन ती पुढे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे बदलापूर ते कर्जत आणि पुढे पुणे-खोपोली या भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कर्जत दिशेकडे जाणाऱ्या लोकल उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा त्या लोकल कर्जतवरून मुंबई सीएसएमटीच्या दिशेने येतानाही मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार आहे. त्यामुळे बदलापूर वरून कर्जतकडे जाणाऱ्या व बदलापूरकडून कर्जतच्या दिशेने सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचेही प्रचंड हाल होणार आहेत.
आज सकाळी सकाळीच मध्य रेल्वेचे हे विघ्नामुळे प्रवासी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने रूळ जोडणीचे काम हाती घेतले असले तरी अद्याप या लोकल सुरू झाल्या नाहीत. पुढील एक ते दीड तासात लोकल सेवा पूर्ववत होईल, असा अंदाज रेल्वेचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत. कर्जत दिशेकडील वाहतुकीला फटका बसल्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यानाही उशिरा होणार आहेत.