

नेवाळी (ठाणे) : कल्याण शीळ रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांना सर्वसामान्य वाहनचालकांकडून टार्गेट केले जात आहे. सातत्याने वाहनचालकांच्या तक्रारीं कोंडीच्या संदर्भात येत असल्याने वाहतूक पोलिसांनी सद्यपरिस्थितीची माहिती वाहन चालकांना देण्यास सुरुवात केली असून मेट्रो बॅरिकेडिंगमुळे अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे म्हटले आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सकाळ-सायंकाळ वाहतूक कोंडीने प्रवास करणे वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. मेट्रोच्या कामाचे बॅरिकेडिंगने कल्याण शीळ रस्त्याच्या दोन लेन ताब्यात घेतल्या असल्याने वाहतूक कोंडीची सर्वाधिक संख्या निर्माण झाली आहे.
मानपाडा चौकात सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक विभागाने म्हटले आहे की, मानपाडा चौक येथे मेट्रो - 12 प्रकल्पाचे काम सुरू असल्याने बॅरिकेडिंगमुळे रस्ता अरुंद झाला आहे. वाहतूक कल्याणकडून शीळ फाट्याकडे सिंगल लेनने संथ गतीने चालत आहे. तर सदरच्या ठिकाणी वाहतूक विभागाचे अंमलदार आणि व वॉर्डन वाहतूक सुरळीत करत असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. या मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होताच वाहनचालकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे वाहन चालकांकडून ठाणे वाहतूक पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. त्यावर आता वाहतूक पोलिसांनी आपली सुरू असलेली कारवाई आणि मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी यांची माहिती तक्रारदारांना देण्यास सुरुवात केली.
होणार्या वाहतूक कोंडीवरील कायद्याने वागा चळवळीचे सदस्य दीपक परब यांनी केलेल्या तक्रारीला ठाणे पोलीस आयुक्तालयाने उत्तर दिले आहे. तर दीपक परब यांनी वाहतूक पोलिसांना म्हटले आहे की, काटई नाका, मानपाडा येथे प्रत्येक दिवशी वाहतूक कोंडी होते. जनतेला त्रास कमी करण्यासाठी उपायोजना करा, असे परब यांनी एक्स वर ठाणे वाहतूक पोलिसांना म्हटले आहे.