Pradeep Purnekar Case : माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू

पूर्णेकर समर्थकांचा नौपाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या; मानपाड्यात केला रास्तारोको, घोडबंदर रोडवर वाहतुकीचा चक्काजाम
Pradeep Purnekar Case
पूर्णेकर समर्थकांनी नौपाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत काही काळ रस्तारोको आंदोलन केले.pudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : उबाठा पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात अखेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना एसआयटी पथकाने चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर त्या मंगळवारी सकाळी मीनाक्षी शिंदे ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात हजर झाल्या. यावेळी राजेंद्र शिंदे व मीनाक्षी शिंदे यांची साततासाहून अधिक काळ पोलिसांनी चौकशी केली. तर दुसरीकडे सुत्रधाराला अटक करा, या मागणीसाठी प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरासमोर आंदोलन करण्यास गेले असता त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. दुपारी नौपाड्यात हमरस्त्यावर रस्ता रोको करून वाहतूकीचा चक्काजाम केला होता. तर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मानपाडा टायटन हॉस्पिटल जवळ केलेल्या रास्तारोको मुळे घोडबंदर रोडवर वाहतुकीचा चक्काजाम झाला.

उबाठा पक्षाचे नेते राजन विचार, केदार दिघे, मनसेचे नेते अविनाश जाधव, कॉग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष मनोज प्रधान, भाजपचे सुरज दळवी हे देखील नौपाडा पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप करीत राजकीय दबावामुळे सुत्रधाराचा पोलीस बचाव करीत आहेत असा आरोप केला. त्यानंतर संतप्त झालेल्या पूर्णेकर समर्थकांनी नौपाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत काही काळ रस्तारोको आंदोलन केले.

Pradeep Purnekar Case
Pune Firecracker Stalls: पुणे महापालिकेच्या फटाका स्टॉल्सच्या उत्पन्नात मोठी घट; यंदा ४५.८३ लाखांची कमाई

परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी हरिनिवासकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरील वाहतूक वळवली. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राबोडीतील जमील शेख यांच्या हत्येचा संदर्भ देत त्यांनी पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप केला.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना सर्व पुरावे देऊन देखील मुख्य सुत्रधारास अटक का होत नाही, असा सवाल करीत पूर्णेकर कुटुंबीयांनी या घटनेचा तपास करीत असलेल्या पोलिसांच्या एसआयटीवर गंभीर आरोप केले. प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. न्याय मिळाला नाही, तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही पूर्णेकर कुटुंबीयांनी दिला.

गुन्ह्यात पकडण्यात आलेला पाचवा आरोपी अमित सिंग हा डमी आरोपी असून त्यास युपीतल्या कुख्यात सुभाष सिंग ठाकूर गॅंगने बळजबरीने प्रयागराज पोलीसांसमोर हजर करवून घेतले असा आरोप देखील यावेळी विक्रांत चव्हाण यांनी केला. एसआयटी फक्त चौकशीचे ढोंग करीत असून या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारांना वाचवण्यासाठी हे सारे नाट्य सुरू असल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीय व समर्थकांनी केला. तर राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतल्यानंतर काही काळ नौपाडा पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता.

Pradeep Purnekar Case
Lawrence Bishnoi : दहशतीच्या ब्रँडिंगमागे कोणाचा खेळ? लॉरेन्स बिष्णोई झालाय 'पोस्टर डॉन'

गुन्ह्यातील सुत्रधारांना पोलीस संरक्षण दिले जात असून फिर्यादींना पोलीस अटक करीत आहेत, हा कुठल्या न्याय आहे असा संतप्त सवाल पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या जमावाने केला. तर संतप्त झालेल्या जमावाने नौपाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत काही काळ रस्तारोको आंदोलन देखील केले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला.

महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे; संजय राऊत संतापले

खासदार संजय राऊत यांनी राम पूर्णेकर यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणाले, "राम पूर्णेकर : मी माझे वडील गमावलेत, मला न्याय हवाय " असा आक्रोश करत राम, एकनाथ शिंदे यांच्या घराकडे आंदोलन करण्यासाठी निघाला तेंव्हा ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले! रामने प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या कटात राजा शिंदे आणि मीनाक्षी शिंदे सहभागी असल्याचे पुरावे दिले, तरी या संशयित आरोपीना ताब्यात घेतले जात नाही! पण, राम पूर्णेकरला पोलीस उचलून घेऊन गेले! महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे, असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला.

...अखेर मीनाक्षी शिंदे ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात हजर

एसआयटी पथकाने राजेंद्र शिंदे यांची सात वेळा अठ्ठेचाळीस तास चौकशी केल्यानंतर आता त्यांच्या पत्नी तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे. मीनाक्षी शिंदे यांना पोलिसांनी निर्देश दिल्यानंतर त्या मंगळवारी ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात हजर झाल्या. यावेळी त्यांची सात तासाहून अधिक वेळ चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आता या चौकशीतुन पोलिसांच्या हाती कोणता पुरावा लागतोय व त्यातून काय समोर येतेय याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

'माझे वडील गेलेत, सर', राम पूर्णेकर ढसाढसा रडले

राम पूर्णेकर हे शिंदे यांच्या निवासस्थानाकडे निघाले होते. पोलिसांनी त्यांना वागळे इस्टेट परिसरात रोखले. त्यावेळी त्यांनी पोलिसांना सोबत जाण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांना बळजबरी रिक्षात बसवले. राम पूर्णेकर हे रिक्षात बसायला तयार नव्हते. पोलीस त्यांची समजूत काढताना दिसत आहेत. राम माझे ऐक, रिक्षात बस. माझ्यावर विश्वास ठेव, असे पोलीस अधिकारी म्हणतात. 'माझे वडील गेलेत, सर', असे म्हणत राम पूर्णेकर हे मोठ्याने रडायला लागले. त्यानंतर पोलीस रिक्षाने त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

चार ते पाच वर्षांपूर्वी राबोडीत जमील शेख यांची हत्या झाली. त्या प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक झालेली नाही आणि शेख कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. त्या प्रकरणात न्याय मिळाला असता, तर आज अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणातही सर्व पुरावे दिल्याचा दावा करूनही कारवाई होत नसल्याने ठाण्यात जमील शेख प्रकरणाची पुनरावृत्ती होत असल्याची भीती वाटते.

अविनाश जाधव, मनसे नेते

हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असल्याचा आमचा आरोप आहे. सर्व पुरावे पोलिसांना दिल्यानंतरही कारवाई होत नसेल, तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? पोलिसांनी घेतलेल्या शपथेची तरी जाण ठेवा. पाचवा अटकेतला आरोपी खोटा आहे, हे जाहीर करू नका, कारण तुमची केस निट चालणार नाही, असा दबाव एका पोलीस अधिकाऱ्याने टाकला.

जयनाथ पूर्णेकर, प्रदिप पुर्णेकरांचे भाऊ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news