

पुणे: दिवाळीत फटाक्यांच्या स्टॉल्समधून महापालिकेच्या तिजोरीत यंदा ४५ लाख ८३ हजार ३४ रुपये जमा झाले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. महापालिकेने फटाका विक्रीच्या स्टॉल्ससाठी राबविलेल्या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत १८४ पैकी केवळ १२८ स्टॉल्सची विक्री झाली, तर ५६ स्टॉल्सना बोलीदारच मिळाले नाहीत. गेल्या वर्षी या माध्यमातून सुमारे ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
त्यामुळे ऑनलाइन लिलावाची प्रक्रिया पारदर्शक असली, तरी यंदा स्टॉल्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील १३ ठिकाणी फटाका विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या जागांच्या विक्रीसाठी महापालिकेने ऑनलाइन लिलाव प्रक्रिया राबविली. त्यासाठी १८४ स्टॉल्स जाहीर करण्यात आले होते. लिलावात सहभागी होण्यासाठी १५२ जणांनी नोंदणी करून बोली लावली.
प्रत्येक स्टॉलसाठी ३४ हजार रुपये मूळ किंमत निश्चित करण्यात आली होती. या प्रक्रियेत सर्वाधिक बोली ९८ हजार रुपयांची लागली. लिलावातून विक्री झालेल्या स्टॉल्सच्या बोलीची रक्कम, त्यावरील १८ टक्के जीएसटी आणि प्रत्येकी एक हजार रुपये स्वच्छता शुल्क यांचा समावेश करून महापालिकेला एकूण ४५ लाख ८३ हजार ३४ रुपये मिळाले आहेत. मात्र, ५६ स्टॉल्सची विक्री न झाल्याने या जागांसाठी पुन्हा ऑनलाइन लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
वर्तकबागेजवळील स्टॉल्सना सर्वाधिक प्रतिसाद
शनिवार पेठेतील वर्तकबागेजवळ नदीकाठच्या परिसरात असलेल्या स्टॉल्सना यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला. येथील ४० स्टॉल्सच्या लिलावासाठी तब्बल ४९ जण सहभागी झाले होते. त्यामुळे या परिसरातील फटाका विक्रीच्या जागांसाठी व्यापाऱ्यांमध्ये अधिक स्पर्धा असल्याचे दिसून आले. शहरातील शनिवार पेठ रिव्हरसाईड, कोंढवा खुर्द येथील अग्निशमन केंद्र, हडपसर, धानोरी, कोथरूड, कात्रज, पर्वती, धायरी, खराडी, बालेवाडी, हडपसर येथील सीझन मॉल, वारजे येथील आरएमडी कॉलेज आणि लोहगाव या परिसरांत फटाका स्टॉल्ससाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
२०२३ पासून ऑनलाइन लिलाव
महापालिकेने २०२३ पासून फटाका स्टॉल्सच्या जागांसाठी ऑनलाइन लिलाव प्रणाली सुरू केली आहे. या पद्धतीमुळे लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत झाली असून, स्टॉल्सच्या जागांचे वाटप ऑनलाइन पद्धतीने केले जात आहे. या प्रक्रियेमुळे महापालिकेला महसूल मिळण्याबरोबरच फटाका विक्रीसाठी नियोजनबद्ध व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.