

मुरबाड शहर : किशोर गायकवाड
मुरबाड नगरपंचायतीतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला असून नगराध्यक्षांविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर रद्द करण्यात आला आहे. नगराध्यक्षांनी स्वतःहून दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आल्याने अविश्वास ठरावासाठी बोलावण्यात येणारी गुरुवारची विशेष सभा रद्द करण्यात आली असल्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्याविरोधात पदावरून दूर करण्यासाठी आज (दि. 26) विशेष सभा आयोजित करण्यात येणार होती. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत नोटीसही जारी करण्यात आली होती. मात्र, या प्रक्रियेपूर्वीच नगराध्यक्षांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी स्वेच्छेने राजीनामा सादर केल्याने सदरची विशेष सभा रद्द केल्याचे पत्रात नमूद आहे. याबाबत मुरबाड नगरपंचायतीचे सर्व सदस्य, कल्याणचे उपविभागीय अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांना कळविण्यात आले आहे.
मुरबाड नगरपंचायतीत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी सुरू होत्या. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी काही नगरसेवक, नगरसेविकांना घेऊन भाजप आमदार किसन कथोरे यांची साथ सोडून ‘परिवर्तन पॅनल’ स्थापन करत शिंदेसेनेत प्रवेश केला होता. मात्र नगरसेवकांशी समन्वय न राहिल्याने नाराजी वाढली आणि अविश्वास ठराव दाखल करण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली.
या संपूर्ण राजकीय उलथापालथीत वनमंत्री समर्थक गटाची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा असून, मुरबाड नगरपंचायतीतील सत्तासमीकरण बदलल्याचे चित्र आहे. परिणामी ठाणे जिल्ह्यातील राजकारणातही शिंदे गटाला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, नगराध्यक्षपद रिक्त झाल्याने पुढील प्रशासकीय व राजकीय प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, मुरबाड नगरपंचायतीत नवे नेतृत्व कोणाचे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डिसेंबरमध्ये नगराध्यक्षांसमवेत भाजपचे नऊ नगरसेवक बंड करून शिंदे सेनेत गेले होते. मात्र पुन्हा सोबतचे नगराध्यक्ष चौधरी व उपनगराध्यक्षा वारघडे तसेच नगरसेवक रामभाऊ दुधाळे, नगरसेविका अनिता मार्के यांची साथ सोडून नगराध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव पारित करून उर्वरित नगरसेवक नॉटरीचेबल झाले होते, त्यानंतर आमदार किसन कथोरे यांच्यासोबत सोशियल मीडियावर व्हायरल झालेले त्या सर्वांचे फोटो चर्चेचा विषय बनले. तर आता ही मुरबाड नगरपंचायतीची राजकीय उलाढाल बऱ्यापैकी सुस्पष्ट होत असून आता एकीकडे एकगठ्ठा झालेले भाजप-शिंदे सेनेचे नगरसेवक व नगरसेविका यांच्यामध्ये नगराध्यक्षाचा चेहरा कोणत्या पक्षाचा असेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.