धर्मांतराबाबतचा खुलासा न केल्यास १ जुलैला मुंब्रा बंद करणार : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे ४०० मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र, विकसीत होत असलेल्या मुंब्य्राला बदनाम करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. अन्यथा, येत्या १ जुलैला मुंब्रा बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिह्याच्या पोलीस अधीक्षकांनी मुंब्रा येथे सुमारे ४०० मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले होते. कोणताही पुरावा नसताना अशा पद्धतीने भाष्य केल्याबद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रात सध्या धार्मिक विद्वेषातून शासन पुरस्कृत दंगली होत आहेत. काल गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे ४०० मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाहीर केले आहे. हा तर मुंब्रा आणि परिसराला बदनाम करण्याचा विषय तर आहेच; शिवाय, हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचा डाव आहे. हिंदू धर्मातील मुले एवढी मुर्ख आहेत की ती स्वत:चे धर्मांतर करुन घेतील? आपण गाझीयाबादच्या त्या पोलीस अधिकाऱ्याला जाहीर आव्हान देत आहोत की त्यांनी पुढे येऊन धर्मांतर करणाऱ्या मुलांचे नाव-पत्ते जाहीर करावेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. त्यांनी केवळ चारच नावे जाहीर करावीत. जर, खरोखर धर्मांतर झाले असेल तर त्याची दखल पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी घ्यायला हवी होती. जर चारशे मुलांचे धर्मांतर केले जात असेल तर हे अधिकारी काय करीत होते? हा प्रकार म्हणजे एका शहराला बदनाम करुन त्याची अर्थव्यवस्था धुळीस मिळवण्याचा प्रयत्न आहे.

आज मुंब्रा, कौसा, शिळ या भागात ५ लाख चौरस फुटांचे अधिकृत बांधकाम सुरु आहे. या घरांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असतानाच अशा खोट्या बातम्या पसरवून अर्थव्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्मांतराची ही बातमी खोटी आहेच; पण, तपासानंतरही ती खोटी निघाली तर काय करायचे. महाराष्टाची निवडणूक जिंकायची आहे म्हणून काय पातळीवरचे राजकारण केले जात आहे. मुंब्य्राला हाताशी धरुन सबंध ठाण्याचे वातावरण खराब करायचे आहे. मग, जितेंद्र आव्हाड तिथे आहेत. मग, आपल्यावर तलवार चालवायची. माझ्या एकट्यासाठी काय काय करणार आहात? असा सवालही आव्हाड यांनी केला.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news