कराड; पुढारी वृत्तसेवा : येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतीसंगमावर नातेवाईकांबरोबर फिरण्यासाठी गेलेल्या मुलीचा प्रीतीसंगमाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने कराड शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
सेजल बनसोडे (वय १७, रा. रेठरे धरण ता. शिराळा ) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रेठरे येथील सेजल बनसोडे ही कराड येथील नगरपालिकेचे हेड मुकादम मारुती काटरे यांची भाची आहे. ती कराड येथे मारुती काटरे यांच्याकडे आली होती. दरम्यान सायंकाळी सेजल बनसोडे ही नातेवाईक व पाहुण्यांसोबत कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतीसंगम घाटावरती फिरण्यासाठी गेली होती. फिरत फिरत ती नदीपात्राकडे गेली. त्यानंतर अचानकपणे ती नदीपात्रात बुडाली. यावेळी नातेवाईकांनी आरडाओरडा करेपर्यंत ती प्रीतीसंगमाच्या पाण्यात बुडाली.
याबाबतची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने कराड शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.