विदर्भ
Maha-E-Office : ‘ई-ऑफिस’ प्रणालीमुळे विभागीय आयुक्तालयात ६०० फाईल्सचा निपटारा
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापनांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयातील दैनंदिन प्रशासकीय कामे 'महा-ई ऑफिस' प्रणालीच्या वापरामुळे सुलभ व गतिमान झाली आहेत. या प्रणाली अंतर्गत आतापर्यंत 600 पेक्षा अधिक प्रकरणांवर निर्णय घेण्यात आले. ही प्रणाली संपूर्ण विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज दिली. (Maha-E-Office)
ई-ऑफिस प्रणाली राज्यात प्राधान्याने नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयापासून ई-ऑफिस प्रणालीचा गतवर्षीच्या स्वातंत्र्य दिनापासून सुरुवात झाली आहे. शासकीय कामात संगणकाचा अधिकाधिक वापर करुन कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्ताऐवज सुरक्षित राहावे तसेच माहिती जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी ई-ऑफिस प्रणाली परिणामकारकपणे राबविण्यात आली आहे. (Maha-E-Office)
या प्रणालींतर्गत पहिल्या टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालयापासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध प्रशासकीय व इतर कामासंदर्भातील फाईल्स पाठविण्याला व त्यावर निर्णयासाठी सात ते दहा दिवसापेक्षा जास्त वेळ लागत होता. या प्रणालीमुळे एक ते दोन दिवसातच या फाईलिंवर निर्णय घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे कामकाजामध्ये गतिमानता येऊन पेपरलेस ऑफिसच्या दृष्टीने प्रशासनात हे एक महत्वाचे पाऊल ठरल्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हास्तरीय महसूल व इतर विभागांकडून ई-ऑफिस प्रणालीव्दारे फाईलचा प्रवास सुरु झाला. यामध्ये 1 हजार 911 फाईल्सची नोंद झाली आहे. आयुक्त कार्यालयातील महसूल, पुरवठा, नियोजन, रोजगार हमी योजना, पुनर्वसन, नगरपालिका प्रशासन, आस्थापना शाखा, विकास शाखा आदी विभागांकडून ई-ऑफिस प्रणाली राबविण्यास सुरुवात झाली आहे.
महसूल विभागात संपूर्ण ई-ऑफिस प्रणाली सुरु करणारा वर्धा जिल्हा राज्यात पहिला ठरला आहे. ई-ऑफिस प्रणालींतर्गत विभागातील नागपूर जिल्ह्यात 632, गोंदिया जिल्ह्यात 60,गडिचिरोली जिल्ह्यात 46,भंडारा जिल्ह्यात 87 तर चंद्रपूर जिल्ह्यात 242 फाईल्सचा निपटारा करण्यात आला आहे.

