Accident : एसटीचा ब्रेक फेल! कारसह दुचाकीच्या धडकेत एकजण जागीच ठार, तर सात जखमी | पुढारी

Accident : एसटीचा ब्रेक फेल! कारसह दुचाकीच्या धडकेत एकजण जागीच ठार, तर सात जखमी

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीवरून परळीकडे जाणाऱ्या एस. टी. बसने कारला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर सात जण जखमी झाले आहेत. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेडकडे पाठवण्यात आले आहे.

गुरुवारी (दि. ८) दुपारी अडीचच्या सुमारास परतवाडा येथून परळी जाणाऱ्या बसचे औंढा हिंगोली रोडवर ब्रेक निकामी झाले. या घटनेत बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दरम्यान बसने कारला (एम एच ३० ए टी १४७७ ) जोराची धडक दिली. दरम्यान या अपघातात एक दुचाकी (क्र. एम एच ३८एल ६६७०) बसच्या पुढील डाव्या चाकात अडकली. ही दुचाकी दोनशे मीटर फरफटत गेल्याने उमरदरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. संजय वामन जाधव (वय ३५) असे मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तसेच सोबत असलेले मारोती वामन जाधव (वय ३२) व लहू संजय जाधव (वय १४) बाहेर फेकल्या गेल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. तर कार मधील धम्मपाल गणपत पुंडगे, पार्वतीबाई गणपतराव पुंडगे (वय 55), रजनी विनय पुंडगे (वय 17), श्रुती प्रेम धवसे (वय 6, औरंगाबाद), नर्मदा तुकाराम सातपुते (वय 52), गजानन तुकाराम सातपुते (वय 38) माथा हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत.

या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सपोनि बाबासाहेब खर्डे,दीक्षा लोकडे, जमादार रविकांत हरकळ, गजानन गिरी, मोहम्मद शेख, अमोल चव्हाण, किशोर परिस्कर, सय्यद बेग आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचविण्यासाठी बघ्यांच्या गर्दीतून काहीच्या सहकार्याने त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहतुकीची कोंडी त्वरित सोडवून पोलीस प्रशासनाने विशेष कार्य केले. संबंधित बसचे चालकाचे म्हणण्यानुसार ब्रेक फेल झाल्यामुळे बस वरील नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Back to top button