Phadke Road : डोंबिवलीची संस्कृती जपणारा ‘फडके रोड’ : जाणून घ्‍या रस्त्याच्‍या नावाचा इतिहास …

Phadke Road : डोंबिवलीची संस्कृती जपणारा ‘फडके रोड’ : जाणून घ्‍या रस्त्याच्‍या नावाचा इतिहास …

भाग्यश्री प्रधान आचार्य : डोंबिवली : पाडवा आला की ढोल ताशांच्या आवाजात नादमय झालेला फडके रोड, फ्रेंडशीप डे आला की तरुणाईच्या जल्लोषात नाहलेला फडके रोड किंवा दिवाळी पहाटला मराठमोळी संस्कृती जपणारा फडके रोड ( Phadke Road ) म्हणजे डोंबिवलीतील नागरिकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. इतकेच नव्हे तर हा रस्ता डोंबिवलीतील सगळ्या राजकीय सभांचा, राजकीय बदलांचा साक्षीदार आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. या रस्त्याला फडके रोड असे नाव का पडलं? या प्रश्नाच्या उत्तरात देखील एक इतिहास दडला असून, जाणून घेवूया या विषयी …

कल्याणमधील प्रमुख नेते बापूसाहेब फडके उर्फ सखाराम गणेश फडके

बापूसाहेब फडके उर्फ सखाराम गणेश फडके कल्याण येथे वास्तव्याला असल्याने खर तर डोंबिवली शहराशी त्यांचा विशेष संबंध नव्हता. मात्र ते त्या काळी कल्याण येथे ज्येष्ठ पुढारी होते. 1895 साली टिळकांच्या प्रेरणेमुळे कल्याण येथे गणेशोत्सवाची स्थापना झाली. त्यावेळी बापूसाहेब हे गणेश स्थापना करण्यासाठी पुढे सरसावलेले.

बापूसाहेब फडके उर्फ सखाराम गणेश फडके 1908 मध्‍ये कल्याण नगरपालिकेचे ते नगराध्यक्षही होते. 1908 – 1909 सालापासून ते जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते. त्यावेळी डोंबिवली शहरातील प्रमुख वस्ती असणाऱ्या तसेच स्थानक परिसर आणि गणपती मंदिराला जोडणाऱ्या या भागाला रस्त्याची व्यवस्था नव्हती. इतकेच नव्हे तर वाटेत चार ते पाच नाले असल्याने पावसाळ्यात हा रस्ता पूर्ण जलमय होत असे. त्यामुळे गावकऱ्यांचा स्थानक परिसराशी संपर्क तुटत असे.

बापूसाहेब फडकेंच्‍या प्रयत्‍नातून १७०० फूट लांबीचा रस्‍ता

लोकल बोर्डाचे लोकनियुक्त अध्यक्ष असणाऱ्या सखाराम उर्फ बापूसाहेब फडके यांची गावातील प्रमुख व्यक्तींनी भेट घेत रास्ता करण्याची विनंती केली. त्यानंतर 19914-15 साली बापूसाहेब यांनी लोकल बोर्डाकडून रस्ता तयार करण्यासाठी दोन हजार रुपये मंजूर करून घेतले आणि गणपती मंदिर ते स्थानक परिसर असा 1700 फूट लांबीचा रस्ता तयार झाला. हा रस्ता त्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या अनुदानामुळे झाल्याने या रस्त्याचे नाव सखाराम उर्फ बापुसाहेब फडके रोड असे पडले.

 याच रस्‍त्‍यावर १९९९ मध्‍ये सुरु झाली गुढीपाडव्याची शोभायात्रा

डोंबिवलीत दुसरा कोणताच रस्ता नसल्याने या रस्त्यावर सभा, आंदोलन होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर याच रस्त्यावर असलेल्या गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी पुढाकार घेत 1999 साली गुढीपाडव्याची शोभायात्रा सुरू केली. अशा पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करणारे डोंबिवली हे शहर महाराष्ट्रातील पाहिले शहर ठरले. इतकेच नव्हे तर शहरात अनेक लेखक, कलाकार, साहित्यिक , गायक, वादक यांचे वास्तव्य असल्याने या शहराला संस्कृतिक शहर असल्याची एक ओळख मिळाली.

Phadke Road : दिपोत्‍सवात खास आकर्षणाचे केंद्र

दिपावलीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे . हा उत्सव जवळ येताच तरुणांमध्ये उत्साह संचारतो. किती वाजता आणि फडके रस्त्यावरील नेमक्या कोणत्या ठिकाणी जमायचे यासंदर्भात अनेक चर्चा आधीपासूनच सुरू होतात. दिवाळी पहाटेच्या दिवशी पारंपारिक वेशभूषेत याच रस्त्यावर असणाऱ्या गणेश मंदिरात सर्व येतात. प्रथम गणेशाला वंदन करून मित्र- मैत्रीणी , नातेवाईक ठरलेल्या ठिकाणी एकत्र जमतात आणि एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात. दरवर्षी याच रस्त्यावर पार पडणाऱ्या संस्कृतीच्या आठवणींचा सडाच या रस्त्यावर पसरलेला असतो. विविध राजकीय पक्ष याच रस्त्यावर दिपावली निमित्त सायंकाळी अनेक कार्यक्रम देखील आयोजित करतात. विद्युत रोषणाईने हा रस्ता सजलेला असतो. हा रस्ता आणखी आठवणी आपल्या भूगर्भात साठवण्यासाठी दरवर्षी सणांचे नव्याने स्वागत करतो. या रस्त्यावर घडत असलेल्या आपुलकीच्या क्षणांमुळे जगण्याची नवीन आशा निर्माण होते. वर्षभर पुरेल इतका आनंद देखील आपण ओंजळीत घेऊन नवीन वर्षाची आतुरतेने वाट बघतो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news