5G Launch : अंबानींचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीनाथजी मंदिरातून होणार 5G चा शुभारंभ | पुढारी

5G Launch : अंबानींचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीनाथजी मंदिरातून होणार 5G चा शुभारंभ

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी राजस्थानमध्ये आज (दि.२२) राजसमंद येथील प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरातून 5G सेवाचा शुभारंभ (5G Launch) करणार आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्सने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवांची बीटा चाचणी सुरू केली होती. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, 5G सेवा सुरू केल्याने राजस्थानमधील लोकांचे जीवनमान बदलणार आहे. ते जागतिक नागरिकांच्या बरोबरीने तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार आहेत.

रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओच्या 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण  (5G Launch) भारतात उपलब्ध होतील. भारताने उशीरा सुरुवात केली असली तरी, सर्वोत्तम दर्जाची आणि स्वस्त 5G सेवा दिली जाणार आहे.

दरम्यान, भारतात डेटा इतका स्वस्त आहे की, पूर्वी 1 जीबी डेटाची किंमत 300 रुपये होती, आता त्याची किंमत 10 रुपये आहे. आज एक भारतीय एका महिन्यात सरासरी 14 जीबी डेटा वापरतो. 2014 मध्ये त्याची किंमत प्रति महिना 4,200 रुपये होती, आता त्याची किंमत 125 ते 150 रुपये आहे. याचा अर्थ असा की गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेले लोक दरमहा सुमारे 4,000 रुपयांची बचत करत आहेत.

5G Launch : अंबानी कुटुंबाची श्रीनाथजींवर अढळ श्रद्धा

यावर्षी सप्टेंबरमध्ये मुकेश अंबानी यांनी श्रीनाथजींचे दर्शन घेतले आणि मंदिराचे महंत विशाल बाबा यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील श्रीनाथजी मंदिरातून 5जी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. अंबानी कुटुंबाचे दैवत श्रीनाथजींवर खूप श्रद्धा आहे. यापूर्वी रिलायन्स जिओनेही येथून 4G सेवा सुरू केली होती.

1 ऑक्टोबर रोजी 5G सेवा सुरू करण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी देशात 5G सेवा सुरू केली. 5G लाँच करताना ते म्हणाले की, हे तंत्रज्ञान केवळ व्हॉईस कॉल किंवा व्हिडिओ पाहण्यापुरते मर्यादित नसावे, त्याचा उपयोग क्रांती आणण्यासाठी व्हायला हवा. नजीकच्या काळात देश अशा तंत्रज्ञानावर काम करेल, ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करेल.

हेही वाचलंत का ? 

Back to top button