कल्याण: नवसाला पावणारी ‘तिसाई देवी’ म्हणजेच ‘जरीमरी माता’

कल्याण: नवसाला पावणारी ‘तिसाई देवी’ म्हणजेच ‘जरीमरी माता’
Published on
Updated on

कल्याण : भाग्यश्री प्रधान आचार्य: आदिशक्ती आदिमायेचं एक रूप म्हणजे कल्याण येथील तिसाई देवी. याच देवीला जरीमरी माता म्हणून संबोधले जाते. अनेक भक्तांचे गाऱ्हाणे आपल्या पदरी घेऊन भक्तांच्या पाठीशी उभी राहून काट्याकुट्यातून चालणाऱ्या भक्तांच्या मार्गात गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालणारी आणि योग्य मार्ग दाखवणारी ही तिसाई देवी. मुंबईपासून ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्हयात तिसगाव नावाचे लहानसे खेडे आहे. त्या गावात तिसाई जरीमरी आईचे मंदिर असून त्यास सुमारे २०० वर्षांचा इतिहास आहे.

ही आहे आख्यायिका

तिसगावातील गणा गायकवाड नावाचा एक सज्जन ग्रामस्थ आपल्या सवंगडयांसह नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गावाजवळील टेकडीवर गेला होता. यावेळी अचानक वादळ सुटले. सर्व गुरे व गुराखी एकत्र जमा झाले. सोसाटयाच्या वा-याबरोबर गणाच्या कानावर ध्वनीचा निनाद झाला. "गणा मी देवी आदिमाया शक्ती तुझ्याशी बोलत आहे, मी गावाजवळील तळयाच्या मध्यभागी पाषाण स्वरुपात आहे. मला वर काढ व माझी स्थापना कर. साधाभोळा गणा, त्यास काही समजेना, त्याने आपल्या सवंगडयांना ही गोष्ट सांगितली. सर्वांनी मिळून गावात जाऊन ही घटना गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सांगितली. या विषयावर गावक-यांची बैठक होऊन गणा म्हणतोय तर शोध घेण्यास काहीच हरकत नाही, असे ठरले.

मोठया उत्साहाने दुस-या दिवशी सर्व ग्रामस्थ गावाजवळील तळयात देवीचा शोध घेण्यासाठी उतरले. वादळांत ऐकलेले शब्द पुन्हा पुन्हा गणाच्या कानावर आदळत होते. झोपेत चालणा-या माणसांप्रमाणे गणा चालत होता. व तळयाच्या मध्यभागी जाऊन त्याने तलावात बुडी मारली, गणा पाण्यातून वर आला तो पाषाण स्वरुपातील देवीची मूर्ती घेऊनच. मूर्ती पाहून सर्वच गावक-यांना आश्चर्य वाटले. व आनंद झाला. त्यांच्या तोंडातून उस्फूर्तपणे देवीच्या नावाचा जयजयकार झाला. आजूबाजूस सर्व खारे पाणी असताना ज्या ठिकाणी देवीची मूर्ती सापडली. त्या ठिकाणचे पाणी मात्र गोड आहे. व ही परिस्थिती आजही तशीच आहे. सर्व गावकऱ्यांनी विचार करुन एका शुभदिनी देवीची स्थापना केली. व एक लहानसे कौलारु मंदिर उभारले. त्या दिवसांपासून गणा गायकवाड गणा भगत म्हणून प्रसिध्दीस आला.

देवीचा महिमा सर्वदूर पसरला

हळूहळू जरीमरी देवस्थानाचा महिमा सर्वदूर पसरु लागला. मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, पुणे एवढेच काय इतर राज्यातूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी तिसगावात येऊ लागले. भक्तिभावाने आपली गा-हाणी देवीला सांगू लागले. देवीही नवसाला पावू लागली. तिसाची आई जरीमरी माता नवसाला पावणारी व संकटकाळी धावून येणारी भक्तांचे श्रध्दास्थान बनली.

देवीचा पुजारी निवडतानाही देवी देते कौल

निसर्ग नियमाप्रमाणे गणा भगत यांचा मृत्यू झाला. व गावक-यांपुढे देवीचा नवीन पुजारी कोणाला ठेवावा, हे ठरविणे अवघड होऊन गेले. एकाएकी चमत्कार झाला. राघो गायकवाड नावाचा तिसगाव पाडयावर राहणारा तिसगावचा रहिवाशी ग्रामस्थांकडे आला. त्याने सांगितले की "माझ्या शरीरामध्ये देवीचा संचार झाला असून मला देवीने भगत म्हणून राहण्याची आज्ञा केली आहे". यावर ग्रामस्थांनी अविश्वास व्यक्त करुन त्याची परीक्षा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी पंच मंडळींची नियुक्ती करण्यात आली. पंचांनी एक योजना तयार केली. गावांतील सर्व मंडळी रात्री ७ वाजता तिसगाव येथील बाळाराम अर्जुन गायकवाड यांच्या घरासमोरील तुळशी वृंदावनाजवळ एकत्र जमली.

त्या ठिकाणी राघो गायकवाड याला बोलविण्यात आले. पंच मंडळींनी अगोदरच पाच रंगाची फुले त्याठिकाणी आणून ठेवली होती. ती फुले सर्वासमोर पंच मंडळींनी बाजूला नेली. व आपआपसांमध्ये ठरवून त्यातील एक फूल कोणासही न सांगता निश्चित केले. ही पाचही फुले राघो गायकवाड याचे समोर ठेवून त्यास सांगितले की, "आम्ही या पाच फुलांपैकी एक फूल तू भगत असल्याची निशाणी म्हणून ठेवले आहे. जर तू ते फूल अचूक उचललेस. तर आम्ही तुझा भगत म्हणून स्वीकार करु'. त्यानंतर राघो गायकवाड याने डोळे मिटून देवीचे स्मरण केले. अंगात एखादया अद्‌भुत शक्तीचा संचार झाल्याप्रमाणे तो थरथरु लागला. व जरीमरी मातेचा जयजयकार करीत त्याने एक फूल उचलून पंच मंडळींच्या हातात दिले. पंच मंडळींनी निश्चित केलेले तेच फूल होते. राघो भगतबरोबरच रामा भगत नंतर पांडू भगत व धर्मा भगत बेंमट्या भगत हे देवीचे भगत झाले. आता वसंत भगत ही सेवा करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news