करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्री सिध्दिदात्री देवी रुपातील पूजा | पुढारी

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्री सिध्दिदात्री देवी रुपातील पूजा

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त आज आश्विन तृतीया शालिवाहन शके १९४४ शुभकृत नाम संवत्सर बुधवार २८ सप्टेंबर २०२२ रोजी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री सिध्दिदात्री देवी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक अनिल कुलकर्णी, नारायण (आशुतोष) कुलकर्णी, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

श्री दुर्गादेवीच्या नऊ अवतारांपैकी (नवदुर्गा) नववा अवतार म्हणजे सिध्दिदात्री. देव, दानव, मानव आदिंना सिध्दी प्रदान करणारी देवी म्हणजे सिध्दिदात्री. सिध्दी म्हणजे असामान्य क्षमता. मार्कण्डेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्त्व आणि वशित्त्व ह्या आठ सिध्दी आहेत. ब्रह्मवैवर्त्तपुराणानुसार ह्या आठ धरुन एकूण अठरा सिध्दी आहेत.

अष्टसिध्दींचे संक्षिप्त वर्णन याप्रमाणे – अणिमा देहाला सूक्ष्म करण्याची शक्ती
महिमा देहाला असीमित विशाल करण्याची शक्ती
गरिमा देहाचा भार असीमित वाढवण्याची शक्ती
लघिमा देहाला अतिशय हलके करण्याची शक्ती
प्राप्ति अदृश्य होऊन कोणत्याही ठिकाणी जाण्याची शक्ती
प्राकाम्य दुसऱ्याच्या मनातील भाव सहजपणे ओळखण्याची शक्ती
ईशित्व स्वतः ईश्वरस्वरुप होण्याची शक्ती
वशित्व कोणत्याही व्यक्तीला आपला दास करण्याची शक्ती. सिध्दिदात्रीच्या कृपाप्रसादानंतर भक्ताची कोणतीही लौकिक आणि पारलौकिक कामना शेष (बाकी) राहत नाही.

देवी पुराणानुसार भगवान शंकरांनी सिध्दिदात्रीच्या कृपेनेच सिध्दी प्राप्त केल्या.तसेच तिच्याअनुकंपेने त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले. त्यामुळे भगवान शंकर अर्धनारीश्वर ह्या नावाने प्रसिद्ध झाले. सिध्दिदात्री कमलासनावर विराजमान आहे. ती चतुर्भुज असून, तिने शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेले आहे.

हेही वाचलंंत का ? 

Back to top button