डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : एका भामट्याने बनावट ई-मेल आयडी तयार केली आणि त्याचा वापर करुन कल्याणमधील एका व्यवसायिकाला ऑनलाईन माध्यमातून 2 लाख 88 हजार रुपयांचा गंडा घातला. व्यावसायिकाने कंपनीत लेखा तपासणी करताना हा प्रकार उघडकीला आला. यानंतर त्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालयाजवळ असलेल्या दीप्ती सोसायटीत राहणारे निखिल दिलीप मेढे (वय 36) या व्यावसायिकाने पुराव्यांसह पोलिसांकडे तक्रार दिली. फेब्रुवारी महिन्यात फसवणूक करण्यात आली होती. परंतु कंपनीत लेखा तपासणी करताना हा प्रकार उघडकीला आल्याने व्यावसायिक निखिल मेढे यांनी अज्ञाता विरुध्द तक्रार दाखल केली.
निखिल मेढे हा व्यावसायिक असून त्यांच्या कंपनीशी नियमित व्यवहार करणाऱ्या ओली व्हायब्रेटर्स इंडिया प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या नाम साधर्म्यासारखा हरीश कुमार ओलीव्हीब्रा कॉम या नावाने बनावट ई-मेल आयडी एका भामट्याने तयार केला. या कंपनीचा प्रतिनिधी निखिल यांच्याशी आर्थिक व्यवहारासंबंधी संपर्क साधत आहे, असे दाखवून या कंपनीला करावयाचे देयक भामट्याने एयु स्मॉल फायनान्स बँकच्या खात्यावर वर्ग करण्यास सांगितले. आपली कुणी तरी फसवणूक करत आहे, असे व्यावसायिक निखिल मेढे यांच्या नाम साधर्म्यामुळे लक्षात आले नाही.
नियमित कंपनीला देयक भरणा करत आहोत, असा विचार करुन निखिल यांनी 2 लाख 88 हजार 245 रुपयांचा भरणा भामट्याने दिलेल्या खात्यावर फेब्रुवारीमध्ये केली. मात्र कालांतराने लेखा तपासणी सुरू असताना कंपनीच्या हा प्रकार निदर्शनास आला. भामट्याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर निखिल मेढे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तशी तक्रार केली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कायद्याचा वापर करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा