Kalyan Residents Protest
सापाड : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत ६५ इमारतींचा मुद्दा गाजत असताना कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावातील जय हनुमान कॉलनी मध्ये बेचाळीस कुटुंबीयांना महापालिकेकडून नोटीस बजावत वारंवार घर खाली करण्यासाठी तगादा लावण्यात आला आहे. त्यामुळे शेकडो रहिवाशी भीतीच्या सावटाखाली असून पावसाळ्याच्या तोंडावर आम्ही जायचं कुठे? हा महत्त्वाचा प्रश्न या शेकडो रहिवाशांच्या समोर उभा ठाकला आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हाला न्याय द्यावा, या विनंतीसाठी रहिवाशांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. मात्र कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावातील जय हनुमान कॉलनीतील बेचाळीस घरांना महापालिकेकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
या नोटिसांच्या अनुषंगाने ही बेचाळीस घरे अनधिकृत घोषित करण्यात आली असून ही घरे तात्काल खाली करण्यासाठी नोटिसांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस प्रशासन आणि महापालिका अधिकारी या घरांतील रहिवाशांना दमदाटी करून घर खाली करण्यासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे हे शेकडो कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. विशेष म्हणजे सातबारा बघून या कुटुंबीयांनी घर घेतले. पोटाला चिमटा काढून मुलांचे शिक्षण बाजूला ठेऊन त्यांनी या घरासाठी आपली आयुष्याची पुंजी देऊ केली. मात्र आता महापालिका हे घर अनाधिकृत असल्याचं नोटिसा बजावत आहे. मग जेव्हा ही बांधकाम उभी होत होती तेव्हा महापालिकेचे अधिकाऱ्यांचे या बांधकामांवर लक्ष गेले नाही का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
अनधिकृत घरे घोषित करून महापालिका तोडण्यासाठी नोटिसा बजावत आहे. मग आम्ही आमच्या लेकराबाळांना घेऊन पावसात जायचं कुठे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आम्हाला बेघर न करता आम्हाला दिलासा द्यावा. जागामालक आणि तक्रारदार यांच्यातील वयक्तिक वादामुळे आज आम्हाला बेघर व्हायला लागत आहे. महापालिकेने आम्हाला टॅक्स लावले, पाणी कनेक्शन दिले, वीज पुरवठा पुरविला, असे असताना आमचे घर अनधिकृत कसे हा प्रश्न रहिवाशांच्या मनात उपस्थित होत आहे. त्यामुळे पावसाच्या तोंडावर आम्हा ४२ कुटुंबीयांना महापालिका बेघर करणार असेल तर आमच्यावर बुलडोजर चालवा नंतर आमच्या घरांवर बुलडोझर चालू अशी भूमिका संतप्त रहिवाशांनी घेतली आहे. त्यामुळे आता महापालिका या ४२ घरांवर कशा पद्धतीने पहाते हे पहाणे देखील गरजेचं ठरणार आहे.
एकीकडे रेरा घोटाळयातील ६५ बांधकामे अनधिकृत घोषित करून कोर्टाने ती जमीन दोस्त करण्याच्या आदेश दिले असताना देखील या इमारती डौलाने उभ्या आहेत. मग आम्हा रहिवाशांच्या चालींवर महापालिकेचा हातोडा कशासाठी, सातबाराच्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या या चालींमध्ये आम्ही राहतो. तक्रारदाराच्या तक्रारीवरून जर आम्हाला बेघर करण्यात येत असेल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील हजारो अनधिकृत बांधकामांवर महापालिका हातोडा घालणार का असा संतप्त सवाल जय हनुमान कॉलनीतील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आमच्या व्यथांचा विचार करून आम्हाला बेघर करू नये अशी विनंती शेकडो रहिवाशांनी केली आहे.
कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात असणाऱ्या जय हनुमान कॉलनीतील रहिवाशांनी आपल्या घरावरील कारवाई थांबवण्यासाठी महापालिका आयुक्तांना गा-हाणे घालण्यासाठी गेले असता महापालिका आयुक्तांनी या नागरिकांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता, निवेदनाचे कागद फेकून देत, रहिवाशांना केबिन मधून बाहेर काढले. त्यामुळे रहिवाशांच्या मनात महापालिका विरोधात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
तक्रारदार आर्थिक अमिषा पोटी या सालीतील घरांवर तक्रार दाखल करतच असल्याचा धक्कादायक खुलासा स्थानिक नागरिकांनी केला आहे. सातबारा मध्ये तक्रारदाराचे कोणतेही अधिकार नाही, पैसे उकळण्यासाठी तक्रारदार या चालीतील नागरिकांची वारंवार तक्रार करत आहे. महापालिका अधिकारी या संपूर्ण प्रकरणात तक्रारदाराशी साटलोट असल्याचा संशय आहे. त्यामुळे तक्रारदाराची चौकशी करून हेतू पुरस्कृर तक्रार दाखल होत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशींनी केली आहे.