

डोंबिवली : गृहप्रपंच सांभाळूनही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमात नोकरी करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यथोचित सन्मान करण्यात आला. परिवहन उपक्रमाद्वारे महिला दिन संपन्न करताना सर्व संवर्गातील महिला कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देखिल देण्यात आल्या. (Kalyan Dombivli Municipal Transport is a public transport company operating in India, run by the Kalyan Dombivli Municipal Corporation)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाद्वारे महिला दिनाचे औचित्य साधून कल्याणच्या गणेश घाट आगार येथे उपक्रमातील महिला कर्मचाऱ्यांचा परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करुन महिला दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपक्रमातील कंत्राटी महिला वाहक, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, शिपाई, लिपिक या संवर्गातील महिला कर्मचाऱ्यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांच्यासह लेखाधिकारी जितेंद्र सोनवणे, आगार व्यवस्थापक किशोर घाडी, कार्यालय अधिक्षक प्रिया निगडे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सोहळ्यास उपस्थित होते. ASRTU या वाहतूक क्षेत्रातील शिखर संस्थेने महिला दिनी आयोजित केलेल्या महिला वाहक कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभामध्ये परिवहन उपक्रमातील वाहक सविता आव्हाड यांची उपस्थिती, मार्गावरील उत्पन्न व वाहक पदावरील सेवा यामध्ये बजावलेली अव्वल कामगिरी या निकषानुसार त्यांचा नवी दिल्ली येथे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे. परिवहन उपक्रमामध्ये साजऱ्या झालेल्या कार्यक्रमात सविता आव्हाड यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित महिलांनी आपले मनोगत सादर केले. यामध्ये प्रामुख्याने उपक्रमात प्रथमच अशा प्रकारे महिलांचा सन्मान सोहळा आयोजित झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून परिवहन व्यवस्थापकांचे मनापासून आभार मानले. तर परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांनी त्यांच्या भाषणात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका राहील,तसेच योग्य मागण्यांची निश्चित दाखल घेतली जाईल, असे आश्वासन देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.