Kalyan Dombivli Metro Project: कल्याण-डोंबिवलीत मेट्रो कामाचा फटका; वाडेघर रिंगरूटवर गर्डर यार्डमुळे वाहतूक कोंडी

रस्त्याच्या मध्यभागी प्रीकास्ट गर्डर निर्मिती; नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनावर नियोजनाअभावी टीका
Kalyan Dombivli Metro Work
Kalyan Dombivli Metro WorkPudhari
Published on
Updated on

सापाड : योगेश गोडे

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेला भविष्यात मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात या कामामुळे स्थानिक नागरिकांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः वाडेघर परिसरातून जाणाऱ्या महत्त्वाच्या रिंगरूट रस्त्यावरच मेट्रोसाठी लागणाऱ्या भव्य गर्डर तयार करण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मेट्रो प्रकल्पासाठी लागणारे काँक्रीट गर्डर तयार करण्यासाठी रस्त्याच्या मधोमधच तात्पुरता यार्ड उभारण्यात आला आहे. या ठिकाणी दिवस-रात्र सिमेंट मिक्सर, क्रेन, ट्रेलर आणि जड यंत्रसामग्रीची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असल्याने संपूर्ण रिंगरूट मार्ग अरुंद झाला आहे. परिणामी वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Kalyan Dombivli Metro Work
Konkan Tourists Stranded: आखाती युद्धाचा फटका; कोकणातील 200 पर्यटक दुबई-कुवैतमध्ये अडकले, 41 जणांची सुखरूप घरवापसी

वाडेघर परिसर हा कल्याण-डोंबिवली शहरातील वाढत्या नागरी वस्तींपैकी एक मानला जातो. या भागातून जाणारा रिंगरूट रस्ता हा अंतर्गत वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र मेट्रो कामासाठी निवडण्यात आलेली गर्डर निर्मितीची जागा ही रस्त्यालगतच असल्याने वाहतुकीचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. गर्डर तयार करण्यासाठी लोखंडी साचे, सिमेंटचे ढिगारे, बांधकाम साहित्य तसेच मोठ्या आकाराचे प्रीकास्ट स्ट्रक्चर रस्त्यावरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंदी निम्म्यावर आली असून दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना, महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षितपणे जाणे कठीण झाले आहे. गर्डर निर्मितीच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Kalyan Dombivli Metro Work
Maharashtra Umrah Pilgrims: ‘उमरा’साठी सौदीत गेलेले हजारो महाराष्ट्रातील भाविक युद्धामुळे अडकले

अनेक ठिकाणी संरक्षणात्मक बॅरिकेडिंग अपुरी असून रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. जड क्रेनद्वारे गर्डर उचलण्याचे काम सुरू असताना वाहतूक पूर्णपणे थांबवली जात नाही. त्यामुळे अचानक वाहनांसमोर यंत्रसामग्री आल्याने अपघात होण्याची शक्यता कायम असते. काही किरकोळ अपघात घडल्याच्या घटनाही स्थानिकांनी सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यालगतच निवासी वस्ती असल्याने धूळ, आवाज आणि कंपनांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसभर सुरू असलेल्या काँक्रीट मिक्सिंगमुळे वातावरणात धुळीचे प्रमाण वाढले असून श्वसनासंबंधी समस्या निर्माण होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

Kalyan Dombivli Metro Work
Israel Iran Conflict: युद्धभूमीत अडकलेले 405 प्रवासी मुंबईत परतले

या मार्गावरून शाळांच्या बस तसेच विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. अरुंद झालेल्या रस्त्यावर मोठ्या ट्रेलरमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक रहिवासी संघटनांनी सांगितले की, ‌‘मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही; मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळून विकास होऊ नये. पर्यायी जागेवर गर्डर निर्मिती केंद्र उभारता आले असते.‌’ रिंगरूट रस्ता हा ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीची गती मंदावली असून आपत्कालीन परिस्थितीत विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी केडीएमसी प्रशासन तसेच मेट्रो प्रकल्पाच्या कंत्राटदार कंपनीवर नियोजनाच्या अभावाचा आरोप केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रीकास्ट गर्डर निर्मितीसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याऐवजी सार्वजनिक रस्त्याचा वापर करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Kalyan Dombivli Metro Work
Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवली हादरली! विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

वाहतूक विभागाकडून योग्य ट्रॅफिक डायव्हर्जन योजना लागू करण्यात आली नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे दिसून येते. रिंगरूट रस्त्यावर सुरू असलेले गर्डर निर्मिती काम तात्काळ स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. तर सुरक्षित बॅरिकेडिंग आणि प्रकाशव्यवस्था वाढवावी, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाण्याची फवारणी करावी, कामाच्या वेळांचे नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी होत आहे.

Kalyan Dombivli Metro Work
Kalyan News | कल्याण-डोंबिवलीत विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

काम तात्पुरते असून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी गर्डर निर्मिती

कल्याण-डोंबिवलीसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरासाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भविष्यात वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास सुलभ होणार असला तरी सध्याच्या टप्प्यात नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे चिंता अजूनच वाढली आहे. विकासकामे करताना स्थानिक नागरिकांचा त्रास कमीत कमी होईल ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही मत व्यक्त होत आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, काम तात्पुरते असून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी गर्डर निर्मिती सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कितपत बदल होतो याकडे आता संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मेट्रो कामामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरत आहे. विकासकामे आणि नागरिकांचे सुरक्षित जीवन यामध्ये संतुलन राखणे हीच खरी गरज असल्याच्या भावना व्यक्त होतांना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news