Israel Iran Conflict: युद्धभूमीत अडकलेले 405 प्रवासी मुंबईत परतले

दुबईहून 205, लंडनवरून 200 जणांची घरवापसी
Israel Iran Conflict
Israel Iran Conflict
Published on
Updated on

ठाणे : आखाती देशांतील युद्ध भडकल्याने तेथे गेलेले महाराष्ट्रातील 700 संपर्कातील प्रवासी आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबईला दोन विमाने पाठवून 164 प्रवासी रात्री मुंबईत आणले. तर, सोमवारी मध्यरात्री 41 प्रवाशांची घरवापसी झाली. दरम्यान, लंडनवरून 200 प्रवाशांना घेऊन मंगळवारी सकाळी ब्रिटिश एअरवेजचे विमान मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यामुळे परदेशातून भारतात परतलेल्यांची संख्या 405 झाली आहे. दरम्यान, अजूनही 200 प्रवासी प्रवासाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारसह विविध यंत्रणांच्या संपर्कात असून, मंत्री गिरीश महाजन यांना समन्वय कार्यात लक्ष घालण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

आखाती देशांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोकणातून दुबई आणि कुवेत येथे गेलेले जवळपास 200 पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये ठाण्यातील 53, सिंधुदुर्गचे 102, रायगड-रत्नागिरीचे 64, कोल्हापूर भागातील 150 लोकांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री दुबईतून 41 प्रवासी घेऊन पहिले विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. एअर इंडियाने पर्यटकांच्या परतीसाठी 10 विमाने तैनात केल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, परतीचा प्रवास करण्यासाठी काही नागरिकांकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत. यामुळे हॉटेलचे बिल व खर्च आता देणे अशक्य झाले असल्याने सरकारने मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून सरकारला केली जात आहे.

सोमवारी रात्री उशिरा यूएईमधून 4 विमाने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळूरला पोहोचली. दुबई आणि अबुधाबीहून दोन हजारांहून अधिक भारतीय परतले. मुंबईला आलेल्या विमानात 41 प्रवाशांचा समावेश होता. इंडिगो एअरलाईन सौदी अरेबियातील जेद्दा येथून हैदराबाद, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादसाठी 10 विशेष विमाने उडवणार आहे. त्याचबरोबर, एअर इंडिया एक्स्प्रेस मस्कतसाठी उड्डाणे सुरू करत आहे. यादरम्यान, अबुधाबीची एतिहाद, दुबईची एमिरेटस्‌‍ आणि फ्लायदुबईने निवडक उड्डाणे सुरू केली आहेत. अबुधाबी विमानतळावरून एतिहादची 15 विमाने इस्लामाबाद, पॅरिस, ॲमस्टरडॅम, मुंबई, कैरो, लंडनसाठी रवाना झाली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने विविध यंत्रणांसह केंद्र सरकारसोबत सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे.

एकनाथ शिंदेंनी दिला 264 प्रवाशांना हात

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन जेट विमानांमधून 264 अडकलेल्या प्रवाशांना दुबईहून महाराष्ट्रात आणले आहे. यातील एका विमानात 188, तर दुसऱ्या विमानात 76 प्रवासी प्रवास करून मुंबई एअरपोर्टला दाखल झाले. हे प्रवासी ठाणे, कल्याण, डोंबिवली, सातारा व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. आखाती देशांतील युद्ध भडकत चालल्याने हवालदिल झालेल्या या प्रवाशांना एअरलिफ्ट करून आणण्यात आले. दरम्यान, लंडनहून ब्रिटिश एअरवेजने मंगळवारी सकाळी 7 वाजता जवळजवळ 200 भारतीय परतले आहेत. आखाती देशांसह युरोपमध्ये राहणारे भारतीय मोठ्या संख्येने भारतात परतत आहेत. लंडनचे विमान आता मार्ग बदलून पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून भारतात परतले.

विशाखा सुभेदार यांच्या मुलाला सुखरूप आणण्याचे आश्वासन

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून त्यांच्या मुलाला सुखरूपपणे मुंबईत परत आणण्याबाबत आश्वस्त केले. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा लंडनला जायला निघाला असता युद्धामुळे कुवेतच्या विमानतळावर अडकला आहे. याबद्दल व्हिडीओद्वारे विशाखा यांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती. त्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाने अभिनयशी संपर्क साधला. आमचे अधिकारी अभिनयच्या संपर्कात असून, तो सध्या आहे त्या हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय केली आहे. तसेच, महाराष्ट्र मंडळाचे डॉ. पैठणकर यांनीही त्यांच्या लोकांना फोन करून त्याच्याशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे. जशी विमानसेवा पूर्ववत होईल तसे त्याला पुन्हा मुंबईत सुखरूप आणण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

विशेष विमानसेवा सुरू होण्याची शक्यता : मंत्री महाजन

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सोडविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. विमानसेवा बंद झाल्यामुळे अनेकजण तिथे अडकले आहेत. दोन ते तीन दिवसांत विशेष विमानसेवा सुरू होण्याची शक्यता असून, सर्वांना परत आणण्यात येईल. सध्या अडकलेल्या नागरिकांच्या हॉटेल बुकिंग आणि पैशाच्या अडचणी असून, त्या सोडविण्यात येत असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिक येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी आखाती देशांत अडकलेल्या पर्यटकांच्या जथ्थाशी ग्रुप कॉल करून 300 ते 400 जणांशी संवाद साधला. सर्वजण सुरक्षित असून, सध्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. काही ठिकाणी हॉटेलचे बुकिंग एजंटमार्फत करण्यात आले होते; मात्र ती मुदत संपलेली होती. त्यामुळे काहींना अडचणी निर्माण झाल्या. मात्र, कोणीही काळजी करू नये. ज्यांच्याकडे राहण्याची किंवा आर्थिक अडचण आहे, त्यांच्यासाठी आवश्यक ती व्यवस्था आम्ही तत्काळ करून देत आहोत. तसेच, परिस्थिती शांत झाल्यानंतर, पुढील दोन-तीन दिवसांत विशेष विमानसेवा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news