Kalyan News | कल्याण-डोंबिवलीत विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

दोन वेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा मृत्यू
Kalyan News
Kalyan News | कल्याण-डोंबिवलीत विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात दोन वेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा मृत्यू झाला. एका कामगाराचा मृत्यू कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या काटई गावच्या हद्दीतील एका बिर्याणी दुकानात झाला. तर दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडे असलेल्या आधारवाडी परिसरामध्ये पाणी खेचण्याच्या पंपातून आलेल्या विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. अजयकुमार दसई गौतम (२०) आणि संदीप घोरीलाल रावत (३५) अशी मृतांची नावे आहेत.

  यातील अजयकुमार गौतम हा मूळचा उत्तरप्रदेश राज्यात बस्ती जिल्ह्याच्या मल्लीपूर तालुक्यातील बाबुपुरा गावचा रहिवासी आहे. अजयकुमारचा नवी मुंबईत कोपरखैरणे येथे राहणारा नातेवाईक अतुलकुमार गौतम याने या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्यान्वये नोंद केली आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा गौतम यांचा मोठा मुलगा अजयकुमार हा मुंबईत काही कामानिमित्त आला होता. कामाच्या शोधात असताना अजयकुमारला डोंबिवलीजवळील कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या काटई गावच्या हद्दीतील ताज बिर्याणी दुकानात काम मिळाले. तेथे तो गेल्या एक महिन्यांपासून काम करत होता. रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिर्याणी दुकानातील आवराआवर झाल्यानंतर अजयकुमारने जेवण करून तो हात धुऊन दुकानात उभ्या असलेल्या एका लोखंडी बाकावर काही वस्तू ठेवण्यास गेला. हात ओले असल्याने आणि त्या लोखंडी बाकात वीज प्रवाह आल्याने अजयकुमारचा स्पर्श होताच तो दुकानात फेकला जाऊन काही क्षणांत बेशुध्द पडला. इतर कामगारांच्या साह्याने दुकान मालकाने त्याला डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स रुग्णालयात आणले. तेथे त्याला डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. कुटुंबियांनी आपल्या मृत नातेवाईकाबाबत कोणताही संशय नसल्याचे पोलिस ठाण्यात लिहून दिले आहे.

  दुसऱ्या एका घटनेत, कल्याण पश्चिमेकडे असलेल्या आधारवाडी परिसरामध्ये संदीप रावत याचा पाणी खेचण्याच्या पंपातून आलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. संदीप हा उत्तरप्रदेशातील होरीलाल गावचा रहिवासी आहे. संदीपचा नातेवाईक असलेला रिक्षाचालक संजय रावत याने या संदर्भात खडकपाडा पोलिस ठाण्यात माहिती दिली. संदीप हा आधारवाडी तुरूंगासमोरील भानुदास गायकर चाळीत राहत होता. घरा शेजारी पाण्याचा पंप सुरू होता. तेथे हात-पाय धूत असताना अचानक पंपात असलेला विजेचा धक्का बसल्याने तो बेशुध्द पडला. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तात्काळ केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news