

ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतनचे ३१ कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले. त्याचे उदघाटन १५ ऑगस्टला झाले. यावेळी लावण्यात आलेल्या कोनशिलांवरून महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे यांच्या जे वारस चालवतात, असे म्हणणाऱ्यांनी तातडीने ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांची घोडचूक सुधारून कोनशिला दर्शनी भागात लावण्याची मागणी केली आहे. परांजपे यांची भूमिका योग्य असल्याचे सांगत वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत एका ठाणेकराने केलेल्या मागणीवरून १९७८ मध्ये गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियमची निर्मिती झाली. त्या ऐतिहासिक गडकरी रंगायतनचे १९९९ मी मध्ये नूतनीकरण करण्यात आले. पुन्हा गडकरी नाट्यगृहाचा कायापालट करण्यात आला. या नव्या रूपातील नाट्यगृहाचे उद्धाटन १५ ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आणि नाट्यगृह खुले झाले. याच नाट्यगृहात आज झालेल्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस यांनी हजेरी लावली आणि कोनशिलाबाबत नाराजी व्यक्त केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना परांजपे यांनी ठाण्याचा इतिहास पुसण्याचे काम ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी केल्याचा आरोप केला. प्रशासक सौरभ राव यांनी मनमानी कारभार करीत असून ऐतिहासिक गडकरी रंगायतनच्या दोन कोनशिला अडगळीत लावण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
१९७८ मध्ये नाट्यगृहाचे भूमिपूजन आणि उदघाटन हे नगराध्यक्ष सतीश प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी कोनशिलेवर ठाकरे, प्रधान, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हाणे, तत्कालीन आमदार, खासदार, नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, सभापती तसेच सर्व पक्षिय अध्यक्षांची नावे कोरण्यात आली होती. १९९९ मध्ये गडकरी नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
त्यावेळी महापौर प्रेमसिग रजपूत, खासदार प्रकाश परांजपे, आमदार मो. दा. जोशी, जिल्हा प्रमुख आनंद दिघे, उपसभापती वसंत डावखरे यांच्यासह तत्कालीन सभापती, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या नावांची कोनशिला दर्शनी भागात लावण्यात आली होती. हा ठाण्याचा इतिहास पुसण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. त्या दोन्ही कोनशिला अडगळीत लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून दर्शनी भागात कोनशिला लावावी असे परांजपे यांनी मागणी करीत जे ठाकरे - दिघे यांचा वारसा चालविण्याचा दावा करतात त्यांनी ही चूक सुधारण्याचा टोला शिवसेनच्या नेत्यांना लगावला आहे.