

डोंबिवली : एमआयडीसीच्या फेज १ मधील सावित्रीबाई फुले कलामंदिर परिसरात असलेले पोस्ट आणि पासपोर्ट ऑफीस चारही बाजूंनी जलमय झाले होते. या संदर्भात डोंबिवलीच्या पोस्ट / पासपोर्ट कार्यालयाला तलावाचे स्वरूप : नाल्यात टाकलेल्या रॅबिट/कचऱ्यामुळे तुंबले पाणी, या मथळ्याखाली दैनिक पुढारीने १० जूनच्या अंकात सचित्र वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत एमआयडीसीला गटारे व नाल्याच्या बांधणीसाठी पोस्ट/पासपोर्ट ऑफिस समोरचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता तोडावा लागला. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नाला/गटारे बांधणीही सुरू करण्यात आली आहे.
एमआयडीसीतील पोस्ट तसेच पासपोर्ट ऑफिसच्या बाजूला असलेला नाला चोकअप झाल्यामुळे मागच्या आठवड्यात याच पोस्ट/पासपोर्ट ऑफिसमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण आणि विभाग सचिव अजय घोरपडे यांनी पाठपुरावा करून स्वत: घटनास्थळी जाऊन तुंबलेले पाणी पंप लावून काढले होते. ऑफिसमध्ये पाणी घुसल्याने तेथील कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते.
पासपोर्ट ऑफिस समोरील सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधण्यात आला तेव्हाच नाल्या संदर्भात कोणतेही नियोजन केले नव्हते. त्यामुळे सुस्थितीत असलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ता तोडण्याची नामुष्की ओढवल्याचे मनसेचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले. रस्ता तोडून नाल्याचे काम चालू करण्यात आले आहे. सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधताना पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटारांची बांधणी केली जाते. गावातील मातीचे रस्ते बनवतानाही नियोजन केले जाते. तथापी अशा चुकीच्या पद्धतीत काम केल्याने जनतेचे करोडो रूपये वाया जात आहेत. चुकीच्या कार्यपद्धतीला विरोध करण्यासाठी मनसेकडून सातत्याने आवाज उठवत राहणार असल्याचेही विभागाध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले.