

ठाणे : नूतनीकरणासाठी गेले अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनचा पडदा स्वातंत्र्यदिनी उघडण्याची चिन्हे आहेत. नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून आता केवळ विद्युत यंत्रणा आणि नाट्यगृहातील ध्वनिक्षेपकाची पातळी तपासण्याचे काम सुरु करण्यात आले असून हे काम झाले कि 15 ऑगस्ट पर्यंत हे नाट्यगृह रसिकांसाठी खुले होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
अनेक वर्षांची नाट्य परंपरा असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून आता हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकार्यांसमवेत प्रत्यक्ष नाट्यगृहाच्या ठिकाणी जाऊन नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी नाट्य दिग्दर्शक विजू माने, नाट्य निर्माते प्रसाद कांबळी आणि अन्य कलाकार उपस्थित होते.
खा. म्हस्के यांनी जवळपास दोन तास कामाची पाहणी करून पालिका अधिकार्यांकडून कामाची माहिती घेतली. तर काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देखील पालिका अधिकार्यांना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही नाट्यगृह सुरु करण्याला प्रशासनाकडून केवळ तारीख पे तारीखच मिळत गेली. नाट्य संस्थांसाठी आणि रसिकांसाठी हे नाट्यगृह कधी सुरु होणार याबाबत सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा सुरु होती. यावेळी मात्र नाट्यगृह सुरु करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे या दिवशी तरी हे नाट्यगृह सुरु होणार का नाही याबाबत रसिकांच्या मनात साशंकता आहे.