

ठाणे : ठाण्यात सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाचा जोर कायम होता. हवामान खात्यानेही रेड अलर्ट जारी केला होता. असे असतानाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षण विभागाने वेळेवर निर्णय न घेता शाळा नेहमीप्रमाणे सुरू ठेवल्या. यामुळे हजारो विद्यार्थी धो-धो पावसात शाळेत पोहोचले. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने शिक्षण विभागाला शहाणपण सुचले आणि घाईघाईने पत्रक काढत त्यांनी विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचे आदेश दिले. या उशिरा घेतलेल्या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची प्रचंड तारांबळ उडाली.
हवामान विभागाने सोमवारी सकाळीच ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. ठाण्यातील अनेक भागात सकाळपासूनच पाणी साचू लागले होते. मात्र तरीदेखील सकाळच्या आणि दुपारच्या शाळा नेहमीप्रमाणे भरवल्या गेल्या. यामुळे सकाळच्या व दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यातून शाळेत पोहोचावे लागले.
दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. ठाणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सकाळ भागात पाणी साचू लागले. जागोजागी वाहतूककोंडी होऊ लागली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येत शिक्षण विभागाने तातडीने आदेश काढले.दुपारच्या सत्रात शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर टाकण्यात आली. शाळा संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचेपर्यंत शिक्षकांनी शाळा सोडू नये, असेही आदेश देण्यात आले. अचानक आलेल्या या आदेशामुळे शाळांत प्रचंड गोंधळ उडाला.
प्रशासनाने आधीपासून सावधगिरी बाळगली असती आणि सकाळीच सुट्टी जाहीर केली असती, तर मुलांना व पालकांना या त्रासाला सामोरे जावे लागले नसते. प्रशासनाचे हे दुर्लक्ष अमान्य आहे. मुलांची सुरक्षितता धोक्यात घालून शाळा सुरू ठेवणे ही गंभीर बाब आहे, अशी कडवट टीका पालक आणि नागरिकांनी केली.
ठाण्यात सोमवारी सकाळी अडीच तासांत तब्बल 16.26 मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत हंगामात ठाण्यात 1,947 मिमी पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचून रस्ते बंद पडले. ठाणे शहरातील अनेक भागांत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. शाळा सुटल्यानंतर पावसाच्या तडाख्यात पालक आणि मुले अडकून पडले, तर काही ठिकाणी शाळा बसेसलाही विलंब झाला.
पालकांना मुलांना आणण्यासाठी मुसळधार पावसात धावपळ करावी लागली. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि शेकडो पालक तासन्तास अडकून पडले. सकाळपासून हवामान विभाग रेड अलर्ट देत होता, मग आधीच सुट्टी का दिली नाही? मुलांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणाला दिला? असा संताप पालकांकडून व्यक्त करण्यात आला.