

डोंबिवली: डोंबिवलीतील एका खळबळजनक हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात विष्णूनगर पोलिसांना तब्बल अडीच वर्षांनंतर यश आले आहे. ओल्या पार्टी दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून रिक्षाचालक असलेल्या मित्राची हत्या करून फरार झालेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. विशेष म्हणजे या खुन्याला पकडण्यासाठी पोलिसांनी नांदेडमध्ये 5 दिवस शेतमजुराचा वेष धारण केला होता.
दीपक साहेबराव करकडे (28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरात असलेल्या खाडीच्या किनारी 27 नोव्हेंबर 2023 रोजी सोमनाथ शिंदे या रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.
दारूच्या पार्टी दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी यापूर्वीच विलन विष्णू ठावरे (41) आणि योगेश तिमाप्पा डोंगरे (42) या दोघांना अटक केली होती. मात्र या संपूर्ण हत्याकांडाचार मुख्य सूत्रधार दीपक करकडे हा घटनेनंतर तात्काळ फरार झाला होता. दीपक करकडे हा गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने स्वतःची ओळख लपविण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगली होती.
त्याने स्वतःकडे कोणतेही ओळखपत्र जसे की आधारकार्ड वा पॅनकार्ड ठेवले नव्हते. इतकेच नव्हे तर पोलिसांना ट्रॅक करता येऊ नये म्हणून तो कधीही मोबाईलचा वापर करत नव्हता. हा खुनी नांदेडमध्ये एका शेतात मजूर म्हणून काम करत होता, जेणेकरून कुणालाही त्याच्यावर संशय येणार नाही.
अखेर हा खुनी नांदेड मधील एका शिवारात लपला असल्याची खबर विष्णूनगर पोलिसांना मिळाली होती. कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. आरोपीचा तांत्रिक सुगावा उपलब्ध नसताना पोलिसांनी माहितीनुसार नांदेड गाठले.
पारंपरिक तपास पद्धतीने लावला छडा
खुनी ज्या भागात लपला होता त्या वाटेगाव परिसरात पोलिसांनी सलग 5 दिवस शेतमजुराचा वेष धारण करून वास्तव्य केले. शेतमजूर म्हणून वावरताना पोलिसांनी दीपकची ओळख पटवली आणि योग्य संधी मिळताच त्याला बेड्या ठोकल्या.
कोणत्याही डिजिटल पुराव्याशिवाय केवळ पारंपरिक तपास पद्धती आणि जिद्दीच्या जोरावर पोलिसांनी ही कारवाई पूर्ण केल्याबद्दल जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
असा घडला होता हत्याकांड
पश्चिम डोंबिवलीतील सत्यवान चौक परिसरातील स्मशानभूमीच्या मागे असलेल्या खाडीच्या किनारी 27 नोव्हेंबर 2023 रोजी रात्रीच्या सुमारास मृत सोमनाथ शिंदे, योगेश डोंगरे, विलन टावरे आणि दिपक करकडे या चौघा मित्रांनी ओली पार्टी केली. व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या चौघांनी एकत्र बसून दारू ढोसली. त्यानंतर चौघेही स्मशानभूमीच्या मागे खाडी किनारी गेले. तेथे सोमनाथचा तिघांशी किरकोळ कारणावरून वाद झाला.
दारूने झिंगलेल्या चौघांमध्ये हमरीतुमरी झाल्यानंतर तिघांनी मिळून सोमनाथच्या डोक्यात दगड घातला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोमनाथला पाहून हल्लेखोरांनी त्याचा आणखी दगडांचा वापर करून मुडदाच पाडला. तेथून पळालेले तिघेही मारेकरी भूमिगत झाले. दगडांनी ठेचून खून केलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या सोमनाथ शिंदे याच्या खून्यांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.