

खानिवडे: वसई तालुक्यातील विरार परिसरात एका शेतकऱ्याच्या वाडीत तब्बल दीड किलोहून अधिक वजनाचा ईडलिंबू लागल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरार पश्चिमेतील उंबरगोठण येथील शेतकरी फरमीन परेरा यांच्या बागेत हे अवाढव्य लिंबू पिकले असून त्याचे वजन तब्बल 1 किलो 650 ग्रॅम इतके नोंदवले गेले आहे.
बालपणी ‘ई रे ईडलिंबू’ म्हणून ओळख असलेले हे फळ आजच्या पिढीला दुर्मिळ झाले आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले ईडलिंबू बाजारात क्वचितच पाहायला मिळते. मात्र परेरा यांच्या वाडीत लागलेल्या या भल्यामोठ्या फळामुळे ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
दुबईतील एका ऑटोमोबाईल कंपनीत तब्बल 15 वर्षे असिस्टंट सर्विस मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर फरमीन परेरा यांनी उच्च पगाराची नोकरी सोडून मायदेशी परत येत शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सध्या ते तीन एकर क्षेत्रात केळी पिकांतील हजारी, बनकेळी, लाल केळी, सफेद वेलची, आंबट वेलची आदी वाणांची शास्त्रशुद्ध लागवड करत आहेत.
तीन वर्षांपूर्वी त्यांनी ईडलिंबूचे झाड लावले होते. सुरुवातीला साधारण आकाराची फळे येत असताना गेल्या दोन महिन्यांत एका फळाचा आकार झपाट्याने वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. योग्य निगा राखल्यानंतर हे फळ तब्बल दीड किलोहून अधिक वजनाचे झाल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
वातावरणातील बदल आणि योग्य देखभालीमुळे हा परिणाम घडल्याचे परेरा यांनी सांगितले. यापूर्वी केळी पिकावर खोडकिडा व श्रीलंकन माशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही परेरा यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी उपाययोजना करत शेती वाचवली होती. त्यांच्या या प्रयोगशील वृत्तीमुळेच आता वसईत ‘महाकाय ईडलिंबू’ चर्चेचा विषय ठरला आहे.