Raigad crime | लोणेरेतील निर्घृण हत्याकांडाचा उलगडा; पाच दिवसांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्याची माहिती समोर येत आहे
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे २१ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणातील आरोपीला अखेर पाच दिवसांच्या शोधमोहीमेनंतर रायगड पोलिसांनी अटक केली असून, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल ह्यांनी पत्रकार परिषदेत दिली

माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेत पल्लवी मोरे (वय २२, रा. वडगाव) हिचा मृतदेह मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये आढळून आला होता. प्राथमिक तपासात आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार (वय 38, रा. लांजा जि. रत्नागिरी ) याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, आरोपीने तरुणीचे हात-पाय बांधून कोयत्याने वार करत हत्या केली. फॉरेन्सिक अहवालानुसार मृत्यूपूर्वी तरुणीला अमानुष शारीरिक छळ सहन करावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हा आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १०३(१) (हत्या) व ६४ (बलात्कार) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी अनुसूचित जातीतील असल्याने तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने गुन्ह्यापूर्वी तयारी केली होती तसेच गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेनंतर माणगाव, गोरेगाव व परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिक, व्यापारी आणि विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. २५ एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला होता. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व लॉज व हॉटेल्सची तपासणी मोहीम हाती घेतली असून नोंदणी पुस्तके व सीसीटीव्ही यंत्रणांची काटेकोर पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भीषण घटनेमुळे ग्रामीण भागातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news