

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 66 वर्षीय जेष्ठ नागरिकाला दिल्ली क्राईम ब्रांच आणि नाशिक पोलिसांचे अधिकारी असल्याचे भासवून तुम्हाला डिजिटल अटक केल्याचा बनाव करून तब्बल 15 लाख 50 हजार रुपयांचा गंडा लावल्याची घटना समोर आलेली आहे. दोन वर्षांपूर्वी भामट्यानी जेष्ठ नागरिकासाठी हनीट्रॅपचा फंडा केला होता. आता डिजिटल अटकेचा फंडा हा नव्याने समोर आल्याने ठाण्यात राहणाऱ्या एकट्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेली आहे.
तक्रारदार हे घरी असताना 7 जानेवारी रोजी त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःचे नाव अजित कुमार सिंग सांगत आपण दिल्ली क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाईल नंबरवरून एका नग्न व्हिडिओ प्रकरणात संपर्क आढळल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करत स्वतःला डेटा प्रोटेक्शन ब्रँच कोलाबा व नाशिक पोलिसांचे अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. तक्रार क्रमांक देत त्यांच्या आधारकार्डचा वापर करून
युनियन बँकेत खाते उघडून दहशतवादी व्यवहारासाठी दोन कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग झाल्याचा आरोप करण्यात आला. तपासासाठी सहकार्य न केल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती दाखवून भामट्यांनी तक्रारदाराकडून वैयक्तिक माहिती, बँक खात्यांचे तपशील आणि संपत्तीची माहिती घेतली. तसेच व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर त्यांच्यावर लक्ष ठेवत असल्याचे सांगून त्यांना घराबाहेर न जाण्याच्याही सूचना दिली. यानंतर “आरबीआयच्या नियमांनुसार पडताळणीसाठी” शेअर मार्केटमधील गुंतवणूक काढून दिलेल्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. याचदरम्यान भामट्यांनी बनावट आरबीआय पत्रही पाठवले. त्यामुळे तक्रारदाराने शेअर मार्केटमधील गुंतवणूक मोडून
भामट्यांनी दिलेल्या खात्यात 15 लाख 50 हजार रुपये ट्रान्सफर केले. काही दिवसांनी त्या भामट्यांनी आणखी पैसे मागितल्याने संशय आल्यावर तक्रारदार यांनी काम करत असलेल्या वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. त्यांनी ही सायबर फसवणूक असल्याचे सांगितल्यावर तक्रारदार यांनी 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधून एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार नोंदवली आणि कापूरबावडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.