

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. मेगाब्लॉकनंतर रेल्वे स्थानकांवर दिरंगाईने सुटणाऱ्या लोकल रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच रेल्वेतील गर्दीचाही सामना करावा लागला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. मध्य रेल्वे प्रशासनाने रविवार 11 जानेवारी, रोजी मध्य रेल्वे मार्गावर घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे ठाणे रेल्वे स्थानकातून दिवा, कळवा, डोंबिवली तसेच इतर डाऊन मार्गावर प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांचा खोळंबा झाला. मेगाब्लॉक दरम्यान लोकल रेल्वे सेवांना अक्षरश: लेटमार्क लागण्याचेही प्रकार अनुभवास मिळाले. तसेच काही संतप्त प्रवाशांनी इतर पर्यायी मार्ग निवडून प्रवासाचा मार्ग निवडला.
मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी छ.शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार डाऊन मार्गावर तांत्रिक कामासाठी व रेल्वे रुळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक नियोजित केला होता, मात्र या मेगाब्लॉकमुळे ठाण्याहून डाऊन मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकल रेल्वे सेवांवर देखील परिणाम होत आहे.
ठाणे अप मार्गावरून प्रवास करणाऱ्या शटल लोकल रेल्वे सेवांना या दरम्यान तत्काळ पुढे रवाना करण्यास देखील ठाणे रेल्वे प्रशासनाला विलंब होत असल्याने ठाण्याहून डाऊन मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा यावेळी संतापाचा पारा चांगलाच चढला होता. दरम्यान ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांसाठी काही विशेष लोकल रेल्वे सेवा मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना माहिती देत लोकल रेल्वे सेवा डाऊन मार्गावर रवाना करायला हव्या होत्या, अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आल्या.
ठाणे रेल्वे स्थानकातून दर दिवशी तब्बल 12 लाख प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, ठाणे आणि मध्य रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांसाठी कोणतीही उपाययोजना नवीन वर्षात देखील सुरू करण्यात आलेली नाही. बहुतांश प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकावर पोहोचण्यास नेहमीच विलंब होत असतो. कित्येकदा प्रवाशांना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलच्या दरवाजात उभा राहून घातक प्रवास करावा लागत असतो.