

मुंबई : मेट्रो 2 ब मार्गिकेवरील पुलाला शून्य आकारातील कमानीचा आधार देण्यात आला असून या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील वाकोला नाल्यावर हा पूल उभारण्यात आला आहे.
डीएननगर ते मंडाळे अशी 23.643 किमीची मेट्रो 2 ब मार्गिका आहे. यावर 20 स्थानके आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारी ही मेट्रो असेल. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गिकाही यामुळे जोडल्या जातील. यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरे जोडली जातील. त्यामुळे मेट्रो 2 ब ही मुंबईतील सर्वाधिक महत्त्वाची मेट्रो मार्गिका आहे. याच मार्गिकेवर शून्य पूल उभारण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. शुन्याचा शोध लावणाऱ्या भारतीय गणितज्ज्ञ आर्यभट्ट यांना हा पूल समर्पित करण्यात आला आहे.
मेट्रो मार्ग 2 ब प्रकल्पांतर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील वाकोला नाल्यावर केबल स्टेड पद्धतीने शून्य पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची एकूण लांबी 130 मीटर असून 80 मीटर लांबीचा मुख्य भाग व 50 मीटर लांबीचा बॅक स्पॅन आहे.
हा संपूर्ण पूल ज्या कमानीच्या आधाराने उभा आहे त्याचा आकार शून्यासारखा आहे. या कमानीची उंची 39.46 मीटर आहे. यासाठी 700 टन स्टील वापरण्यात आले आहे.