

Congress-BJP Alliance in Ambernath: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देणाऱ्या भाजपने अंबरनाथमध्ये थेट काँग्रेसशी हातमिळवणी करत शिवसेना शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आघाडीमुळे अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप, काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली आहे. या आघाडीच्या जोरावर भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. एकूण 32 नगरसेवकांचा पाठिंबा या आघाडीला मिळत असून, त्यात भाजपचे 14, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे 4 नगरसेवक सामील आहेत. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत तयार झाले आहे.
या घडामोडींमुळे शिवसेना शिंदे गटात तीव्र नाराजी आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका करत या युतीला “अभद्र आणि संधीसाधू युती” असं म्हणलं आहे. शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किनिकर यांनी भाजपवर थेट आरोप करत, काँग्रेसविरोधात भूमिका घेणाऱ्या भाजपनेच आता काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली.
दरम्यान, भाजपकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी सांगितले की, अंबरनाथच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला असून शिंदे गटासोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न झाले होते, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे इतर पक्षांसोबत आघाडी करून सत्तास्थापन करण्यात आली.
या सत्ताबदलामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अंबरनाथमधील हा निर्णय केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, अंबरनाथमधील भाजप–काँग्रेस आघाडीबाबत प्रश्न भाजप नेतृत्वालाच विचारले पाहिजेत. शिवसेना विकासाची भूमिका घेणाऱ्यांसोबत राहील आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेने सत्तेत असताना केलेल्या विकासकामांचा जनतेला फायदा झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच अंबरनाथमधील या अनपेक्षित युतीमुळे राज्याच्या राजकारणात नवे प्रश्न निर्माण झाले असून, पुढील काळात याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.