

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्याप्रमाणावर धांदली झाली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली शिवसेनेच्या सहा नगरसेवकांना बिनविरोध घोषित केल्याचा आरोप करत, या निवडणूक प्रक्रियेविरोधात मनसेने निवडणूक आयोगाकडे तक्रार करताना ठाणे न्यायालयात धाव घेतली आहे. ठाण्यातील पाच जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने बिनविरोध नगरसेवकांसह निवडणूक अधिकारी वृषाली पाटील ह्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत मनसेचे ठाणे, पालघर अध्यक्ष अविनाश जाधव आणि उबाठाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी सत्ताधारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करीत निवडणूक आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेणारे उबाठाच्या तीन उमेदवारांविरोधात पोलिस तक्रार केली आहे.
मनसेने सोमवारी (दि. ५) निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांच्याकडे अविनाश जाधव यांनी तक्रार केली. तसेच निवडणूक प्रक्रिया त्यातील घोळ, निवडणूक अधिकारी यांचा सावळागोंधळ, उमेदवारी अर्ज बाद करणे, माघार घेणाऱ्या उमेदवारांची चौकशी, पोलिस यंत्रणेचा वापर आदीबाबत चौकशी करून कारवाई करण्यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव आणि उमेदवार जाबर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच दोन स्वंयसेवी संघटनांनी याचिका दाखल केल्या आहे. या याचिका न्यायालय दाखल करुन घेणार की फेटाळून लावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.