

भिवंडी : 90 पैकी केवळ 23 नगरसेवक पदरी असलेल्या भाजपने अखेर नवीन गणिते जुळवत महापौरपद मिळवले आहे. तर, काँग्रेसच्या पदरी उपमहापौरपद आले आहे. शुक्रवारी झालेल्या भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी काँग्रेसचे 30 आणि शरद पवार राष्ट्रवादीचे 12 आणि भाजपच्या 6 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत 48 मतांसह महापौरपदाला गवसणी घातली. शिवसेना आणि कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना 25, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मते मिळाली.
या महापालिकेत काँग्रेसची 30, भाजप - 23, राष्ट्रवादी शरद पवार - 12, शिवसेना 12, समाजवादी 6, भिवंडी विकास आघाडी 3, कोणार्क विकास आघाडी 4 असे एकूण संख्याबळ होते. यावेळी भाजपने नारायण चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र नंतर आपला उमेदवार भाजपने बदलला आणि स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतर चौधरी यांनी भाजपशी फारकत घेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेसचा पाठिंबा घेऊ न महापालिकेत बहुमत करत महापौरपद पदरात पाडून घेतले तर उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांची वर्णी लागली आहे. तारिक मोमीन यांनी यापूर्वी महापौरपदासाठी अर्ज भरला होता. नंतर त्यांनी चौधरींना पाठिंबा देऊ न आपला अर्ज मागे घेतला.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षात चांगल्याच उलथापालथी आणि त्यातून काही नवीन समीकरणं जुळत असल्याचे दिसत आहे. भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. जवळपास महिनाभर आघाडी-युतीची आकडेमोड सुरू होती. त्यातून काही नवीन समीकरणं जुळून आल्यानंतर आज मोठी घडामोड झाली.
भाजपचे बंडखोर नारायण चौधरी हे भिवंडी-निजामपूर महापालिकेचे महापौर झाले आहेत. महापौर पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेळ वाढवण्याची मागणी केली. वाहतूक कोंडी असल्याने महापौर पदाचे कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना सभागृहात यायला उशीर झाला. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी वेळ वाढवण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर एकूण 10 पैकी 7 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. नारायण चौधरी, स्नेहा पाटील आणि विलास पाटील हे रिंगणात राहिले.
भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीने अत्यंत नाट्यमय वळण घेतले. भाजपचे महापौरपदाचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना मतदान करण्यासाठी चक्क काँग्रेसने व्हिप जारी केला. उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमिन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
नारायण चौधरी यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह काँग्रेसच्या नेतृत्त्वातील सेक्युलर फ्रंटमध्ये प्रवेश केला. तर, दुसरीकडे महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांच्या कडून भाजपा नगरसेवकांना पक्षादेश जारी करण्यात आला. महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील तर उपमहापौर पदासाठी सुहास नकाते यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते.
काँग्रेसचे 30, शरद पवार राष्ट्रवादी 12 आणि समाजवादी पक्ष 6 असे महाविकास आघाडीकडे 48 मतांचे बहुमत होते. मात्र महाविकास आघाडीकडे फाटाफूट झाल्यामुळे सरळ होणारी निवडणुकीत नवे ट्विस्ट आले. आणि महाविकास आघाडीच्या होणाऱ्या महापौराच्या जागी भाजपची वर्णी लागली.
सुरुवातीला काँग्रेसच्या तारिक मोमीन यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, समाजवादी पक्ष हा शिवसेनेसोबत गेल्यामुळे भाजपच्या बंडखोराबरोबर काँग्रेसने हातमिळवणी केली. त्यामुळे भिवंडीचे राजकारण बदलले.
नारायण चौधरी हे मूळचे भिवंडीतील ताडाली परिसरातील रहिवाशी असून 2002 पासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. सर्वप्रथम 2002 मध्ये ते नगरसेवक बनले, 2002 ते 2007 मध्ये त्यांनी भिवंडी विकास आघाडीमधून नगरसेवक म्हणून कारकीर्द सांभाळली. तर, 2007 ते 2012 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत आपला वेगळा ठसा निर्माण केला. मात्र, 2012 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. 2012 ते 2017 दरम्यान समाजवादी पक्षातून त्यांची पत्नी अलका नारायण चौधरी यांना नगरसेविका म्हणून निवडून आणले. त्यानंतर, 2017 मध्ये नारायण चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, राज्यातील बदललेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर 2025 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. दोन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर नुकतेच झालेल्या भिवंडी महानगरपालिकेतही ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून विजयी झाले. यावेळी, त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच त्यांना भाजपाकडून महापौर पदासाठी उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी भाजपने उमेदवार बदलल्याने त्यांनी सेक्युलर फ्रंटकडून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळेस भाजपमधून फुटून काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या सेक्युलर फ्रंटमध्ये ते दाखल झाले होते. काँग्रेसने नारायण चौधरी यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित करत त्यांनाच मतदान करण्याबाबतचा व्हीप जारी केला होता. त्यामुळे, सेक्युलर फ्रंटचे उमेदवार बनून ते पहिल्यांदा महापौर बनले आहेत.
भाजपचे चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा पाठिंबा होता. मात्र, स्थानिक नेतृत्वाने विरोध केल्यामुळे त्यांची उमेदवारी बदलून स्नेहा पाटील यांना देण्यात आली होती. कोणार्क आघाडी आणि भिवंडी विकास आघाडीचे नगरसेवक हे शिवसेनेसोबत राहिले. तर, भाजपच्या मतामध्ये मात्र दोन गटात विभागणी झाली. भाजपच्या अधीकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मते पडली. तर 6 मते चौधरी यांना पडली. त्यामुळे भाजपच्या मतामध्ये फूट पडल्याचे दिसत असून भाजप आता या निवडणुकीबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चौधरी यांचे अभिनंदन केले असून चौधरी हे भाजपचे महापौर म्हणून आता कार्यरत राहण्याची शक्यता आहे.
शहराचा विकास करणे हेच आमचे प्राथमिक प्राधान्य व ध्येय असणार असून मला उपमहापौर पदी विराजमान करणाऱ्या सर्व वरिष्ठांचा मी आभारी आहे. भिवंडीतील जनतेने मला निवडून दिले त्याबद्दल जनतेचे देखील आभार मानतो. निश्चितच भिवंडीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार.
तारिक मोमीन उपमहापौर, भिवंडी मनपा
हा भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. सेक्युलर फ्रंटचा विजय आहे. विचार बदला, भिवंडी बदलेल. आम्ही तोडण्याचे काम करत नाही, जोडण्याचे काम करतो. भिवंडीमध्ये आम्ही एकत्र आलो ते विचारांच्या दिशेने आणि या शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर काम करू.
सुरेश म्हात्रे, खासदार राष्ट्रवादी (शरद पवार)
भिवंडी महापालिकेत महापौरपदी निवडून आलेले नारायण चौधरी हे भिवंडी सेक्युलर फ्रंटचे महापौर आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत काँग्रेस, समाजवादी हे पक्ष भाजपकडून फोडण्यात येत होते. मात्र पहिल्यांदाच महायुती व भाजप फुटली आहे आणि त्यामुळे भिवंडीचा सेक्युलरचा महापौर बनला आहे. यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी व समाजवादीच्या नगरसेवकांचा देखील पाठिंबा सेक्युलर फ्रंटला राहिला आहे, असे मत आमदार रईस शेख यांनी व्यक्त केले.
रईस शेख, समाजवादी आमदार (भिवंडी पूर्व)
भाजप शिवसेनेसोबत गेला असता तरीही बहुमत होते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ न भाजपच्या सहा लोकांनी महापौरपद मिळवले, मात्र भाजप संपूर्णपणे शिवसेनेसोबत राहिली असती, तर शिवसेनेने आपले 12, कोणार्क आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3 आणि समाजवादी पार्टी 6, असे 25 संख्याबळ केले होते. भाजपची 22 मतेत्यांच्याकडे आली असती तर हे संख्याबळ 47 वर जात होते. तोही बहुमताचाच आकडा होता. मात्र, भाजपच्या सहा नगरसेवकांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे जात महापौरपद मिळवले आहे. त्यामुळे जास्त जागा निवडून आणणाऱ्या काँग्रेसला मात्र, उपमहापौरपदावर समाधान मानावे लागले.
भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले होते, त्यात नारायण चौधरी यांचे दोन अर्ज होते. हे दोन्ही अर्ज वैध असल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी दोन पैकी एक अर्ज मान्य केला. तर सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. ज्यात कोणार्कचे मयुरेश पाटील, प्रतिभा पाटील यांनी आपले अर्ज माघारी घेतले. शिंदेसेनेचे बाळाराम चौधरी व सुचिता म्हात्रे यांनी देखील आपले अर्ज मागे घेतले तर काँग्रेसचे तारिक मोमीन व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महापौर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नारायण चौधरी, शिंदेसेनेकडून विलास पाटील तर भाजपकडून स्नेहा पाटील हे तीन उमेदवार महापौर पदाच्या निवडणुकीत होते.सुरेश म्हात्रे, खासदार राष्ट्रवादी (शरद पवार)