

Ambernath Municipal Council : महाराष्ट्रातील अंबरनाथ नगर परिषद निडणूक फक्त राज्यात नाही तर देशात राजकीय चर्चेचा विषय ठरली होती. इथं सत्तेसाठी भाजप अन् काँग्रेस एकत्र आल्यानं सर्वांनीच तोंडात बोटं घातली होती. त्यानंतर राज्यातील मोठ्या नेत्यांनी या अभद्र युतीला चाप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र बुधवारी भाजपनं मोठी खेळी करत काँग्रेसच्या निलंबित १२ नगरसेवकांचा पक्षप्रवेशच करून घेतला.
अंबरनाथमध्ये बुधवारी रात्री मोठा राजकीय खेळ झाला असून काँग्रेसचे नुकतेच निवडून आलेले सर्व १२ नगरसेवक हे भाजपमध्ये सामील झाले आहेत. काँग्रेसने निवडणुकीनंतर भाजपशी हातमिळवणी केली म्हणून कारवाई करत यांना निलंबित केलं होतं.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे सर्व निलंबित नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले आहेत. बुधवारी रात्री रविंद्र चव्हाण यांनी या काँग्रेसने निलंबित केलेल्या सर्व १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. त्यानंतर याची औपचारिक घोषणा देखील करण्यात आली.
काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष परंपरागत आणि वैचारिकदृष्ट्या देखील कट्टर विरोधक आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असं कोणालाही स्वप्नात देखील वाटलं नसेल. मात्र ही 'स्वप्नवत' कामगिरी अंबरनाथ नगरपरिषदेत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी करून दाखवली होती.
सत्तेसाठी भाजपचे निवडून आलेले १४ नगरपरिषद सदस्य, काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाटाचे ४ सदस्यांनी मिळून युती केली होती. त्यानंतर अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील यांना नगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं.
अंबरनाथमधील सत्तेचा पॅटर्न देशभर गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथ मधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. हे पक्षशिस्तीच्या विरूद्ध असल्याचं सांगत युती तोडण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर काँग्रेसने देखील आपल्या १२ निवडून आलेल्या नगरसेवकांवर निलंबनाचा कारवाई केली होती. यानंतर बुधवारी रात्री राजकीय घडामोडींना वेग आला अन् अंबरनाथमध्ये निलंबित १२ काँग्रेस नगरसेवकांनी थेट भाजपचं कमळ हातात घेतलं.