

अंबरनाथ : मागील तीस वर्षांची शिवसेनेची परंपरा मोडीत काढत भाजपाने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. निवडणुकीनंतर शिवसेना भाजपा पुन्हा युती होईल. अशी परिस्थिती असताना शिवसेनेला डावलून भाजपा ने थेट काँग्रेसची कास धरल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील यांनी शुक्रवारी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
देशात आणि राज्यात शिवसेना-भाजपाची युती आहे. दोघेही पक्ष हिंदुत्वाची कास धरणारे आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये युती फिस्कटल्याने थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोघेही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत होते. त्यात भाजपाने आपल्या राजकीय खेळीने ही निवडणूक जिंकल्याने, शिवसेनेला मागील तीस वर्षात प्रथमच पराभवाचा सामना करावा लागल्याने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हा पराभव जिव्हारी लागला आहे.
या निवडणुकीत शिवसेनेचा नगराध्यक्ष पराभूत झाला असला तरी, शिवसेनेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आल्याने शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. तर भाजपाला अवघ्या 14 जागा जिंकता आल्या. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी शिवसेना-भाजपाची युती होईल अशीच सर्वत्र चर्चा असताना भाजपाने मात्र आपली वेगळी खेळी खेळत शिवसेनेलाच सत्तेबाहेर ठेवत काँग्रेस व राष्ट्रवादी (अ.प) यांची कास धरून नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या रणनीती मध्ये आमदार किसन कथोरे व माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.