दोडामार्ग, राधानगरी व्याघ्रक्षेत्र घोषित होणार | पुढारी

दोडामार्ग, राधानगरी व्याघ्रक्षेत्र घोषित होणार

ठाणे : विश्वनाथ नवलू : पश्चिम घाटातील सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत येणार्‍या जांभळीपाड्यापासून सिंधुदुर्गातील तिलारी खोर्‍यापर्यंतचे क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर होणार आहे. या भागात पट्टेरी वाघाच्या खुणा आढळल्याने 67.82 चौ.कि.मी.चे क्षेत्र राखीव क्षेत्र म्हणून घोषित करताना स्थानिकांचे हक्क अबाधित ठेवले आहेत. सिंधुदुर्ग, चंदगड या क्षेत्रांमध्ये हत्तींचा अधिवास असल्याने राधानगरी अभयारण्याच्या दक्षिण बाजूला हत्ती आणि व्याघ्र प्रजनन केंद्रे विकसित होणार आहेत.

या भागातील जैवसंवर्धन आणि जैवविविधतेची वैशिष्ट्ये जोपासण्यासाठी उभयचर, सरपटणारे प्राणी, दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन शक्य होणार आहे. वाघ, बिबटे, अस्वल, गवा, सांबर, शेकरू, उंच पायाचे माकड, हत्ती, चारशिंग्या या प्राण्यांच्या जतन-संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मायनी समूह पक्षी संवर्धनाच्या द़ृष्टीनेही पावले उचलली जाणार असून, फ्लेमिंगोसह 36 प्रजातींचे संवर्धन तसेच स्थलांतरित पक्ष्यांसाठी योग्य अधिवास, पाणपक्ष्यांसाठी आश्रयस्थाने निश्चित केली जाणार आहेत. महाराष्ट्रात 11 नवीन वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित केली आहेत.

यामध्ये पट्टेरी वाघ, अन्य वन्यजीव वनस्पतींच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे 317.670 चौ.कि.मी आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे 423.550 चौ.कि.मी असे मिळून हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोयना, चांदोली अभयारण्यामधील राखीव जागा व राधानगरी, तिलारी जंगलाचा परिसर हा टायगर कॉरिडोर म्हणून ओळखला जातो.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वन्यजीव अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते पुढे गोवा आणि कर्नाटकातील जंगल असा वाघांच्या संचाराचा मार्ग आहे. हा जंगल परिसर वाघासाठी पोषक आहे. येथे मानवी उपद्रव व घुसखोरी कमी आहे.

Back to top button