ठाणे लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र फाटक? भाजपचे वाढले टेन्शन | पुढारी

ठाणे लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र फाटक? भाजपचे वाढले टेन्शन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी भाजप नेतृत्वाने धक्का तंत्राचा वापर करीत २८ जागांपैकी २४ खासदारांना पुन्हा उमेदवारी नाकारून राज्यसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपच्या रणनीतीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी संधी मिळू शकेल मात्र डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यासाठी मतदारसंघ नसल्याने भाजपकडून ठाण्यावर दावा ठोकला जात आहे. तर धर्मवीर आनंद दिघेंची कर्मभूमी असलेला ठाण्याचा गड राखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्तिय सहकारी माजी आमदार रवींद्र फाटक यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत.

राज्यसभेसारख्या वरिष्ठ सदनाचा अनुभव असणाऱ्या नेत्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवावी, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी फार पूर्वीच स्पष्ट केले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला, व्ही. मुरलीधरन, आणि राजीव चंद्रशेखर लोकसभेच्या रिंगणात उतरतील, हे काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे. राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ आणि जावडेकर हे पुण्यातून निवडणूक लढू शकतात. पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठविण्यात आल्याने जावडेकर यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे डॉ. विनय सहस्रबुदधे हे राहत असलेल्या ठाण्याचा लोकसभा मतदार संघ हा महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेचा आहे. ठाणे लोकसभा मतदार संघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांची कर्मभूमी असलेल्या ठाण्यावरील दावा कुठल्याही परिस्थितीत सोडायचा नाही, असे मत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. शिवसेना फुटल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाकरे यांना साथ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आवाज बुलंद केला. त्यामुळे शिंदे गटाने खासदार विचारे यांना पराभूत करून स्वतःची ताकद दाखविण्याचा निर्णय केला आहे. त्याकरिता तगडा आणि सक्षम उमेदवार शोधला जात आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा सुरू असताना जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांचे नवी मुंबईत लागलेले पोस्टर्स हे निवडणूक लढविण्यात इच्छुक असल्याची चर्चा रंगली आहे. आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतून दिवंगत माजी उपसभापती वसंत डावखरे यांचा पराभव करून आमदार बनलेले रवींद्र फाटक यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. दिवंगत आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करणारे फाटक हे सक्षम उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाकडे दोन सक्षम उमेदवार उपलब्ध असल्याने कुठल्याही परिस्थितीत ठाण्याची जागा भाजपला सोडायची नाही, असा निर्धार शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे. या जागेऐवजी दुसरा मतदार संघ सोडून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवण्याच्या नितीवर शिंदे गटाकडून काम केले जात आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे या घरावर भाजपकडून दावा ठोकण्यात आला आहे. ठाणे लोकसभेत शिंदे गटाची ताकद कशी आणि किती आहे, याची गणित मांडली जात आहेत. या मतदारसंघातील सहा पैकी चार आमदार भाजपचे आणि शिंदे गटाचे दोन आमदार असताना ठाणे पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्याची रणनीती आखली जात आहे. त्यानुसार माजी खासदार संजीव नाईक यांनी काम सुरू केले आहे. नाईक हे सहस्त्रबुद्धे यांच्यापेक्षा सर्वार्थाने सक्षम उमेदवार मानले जातात. परिणामी भाजपच्या रणनीतीनुसार सुरक्षित लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची सहस्त्रबुद्धे तसेच माजी खासदार संजीव नाईक यांची वाट खडतर बनली आहे.

हेही वाचा : 

Back to top button