ठाणे: श्री रामाच्या दर्शनसाठी मीरारोड येथील ३०० भक्त अयोध्याला पायी जाणार | पुढारी

ठाणे: श्री रामाच्या दर्शनसाठी मीरारोड येथील ३०० भक्त अयोध्याला पायी जाणार

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीरोजी होणार आहे. श्री रामाची मूर्ती विराजमान झाल्यानंतर मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. दरम्यान, श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी मीरा रोड ते अयोध्या अशी पदयात्रा मीरा भाईंदरमधील ३०० राम भक्त काढणार आहेत. १० डिसेंबररोजी राम भक्तांच्या पदयात्रेस शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत. ४१ दिवसांचा प्रवास करून श्रीराम भक्तांची पदयात्रा २१ जानेवारीला अयोध्येत दाखल होणार आहे.

अयोध्येत प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर उभे राहत आहे आणि त्यात त्यानंतर मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. तमाम राम भक्तांसाठी हा आयुष्यातील सर्वोच्च सुवर्ण क्षण असून त्यामुळे मीरा भाईंदरचे ३०० भक्त पायी अयोध्येला जाणार आहेत. या पदयात्रेसाठी लागणारा सर्व खर्च आमदार प्रताप सरनाईक करणार आहेत.

१० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता वेस्टर्न हॉटेलजवळील मंदिरातून ३०० भाविक अयोध्येकडे रवाना होणार आहेत. पहिल्या दिवशी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी मीरा रोड ते ठाणे असे २५ किलोमीटर अंतर हजारो भक्त चालून ठाण्याच्या वेशीवर या भक्तांना पुढील पदयात्रेस शुभेच्छा देणार आहेत. त्यानंतर जिथून ही राम भक्तांची पदयात्रा जाईल, त्यांचे शिवसेनेकडून प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी स्वागत केले जाणार आहे.

हेही वाचा 

Back to top button