ठाणे: डोंबिवली एमआयडीसीत केमिकल ड्रमचा स्फोट; ४ कामगार गंभीर जखमी

बॉम्बस्फोट
बॉम्बस्फोट

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 पट्ट्यात असलेल्या एका केमिकल कंपनीत रविवारी सकाळच्या सुमारास दुर्घटना घडली. केमिकलने भरलेल्या ड्रमचा स्फोट होऊन त्यात ४ कामगार गंभीर भाजले आहेत. कबीर भोईर, राजू राठोड, सुमित राय आणि अभिषेक कुमार शाहू अशी जखमी कामगारांची नावे आहेत. या प्रकरणी स्थानिक मानपाडा पोलिस ठाण्यात कंपनी प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या स्फोटात होरपळलेल्या कबीर मोतीराम भोईर (वय 44, रा. कुंभार्ली गाव, ता. कल्याण) याच्या जबानीवरून पोलिसांनी दीपक म्हात्रे आणि व्ही. सी. एम. पॉलीयुरोथिन प्रा. लि. कंपनी प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कबीर भोईरसह अन्य कामगार या कंपनीत दुसऱ्या मजल्यावर साफसफाईचे काम करत होते. कंपनीचे मॅनेजर व कंपनी प्रशासनाने सदर ठिकाणी केमीकलचा एक लहान ड्रम ठेवला होता.

सदर केमीकल व रॉ मटेरीयलच्या ड्रमबाबत सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना आणि दक्षता घेतली नव्हती. यात कंपनी प्रशासनाचा बेकादरपणा, हयगय व निष्काळजीपणा कारणीभूत ठरला. केमीकल व रॉ मटेरीयलचा ड्रम ठेवलेल्या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या ज्वालाग्राही केमीकलच्या ड्रमवर पडल्याने ड्रम फुटून त्यातील केमीकल वेगाने बाहेर पडले. हे केमिकल तेथे काम करणाऱ्या कबीर भोईरसह अन्य तिघा कामगारांच्या अंगावर पडले. यात चारही कामगार गंभीर जखमी झाले.

या दुर्घटनेनंतर कंपनीत पळापळ झाली. जखमी कबीर भोईर, राजू राठोड, सुमित राय आणि अभिषेक कुमार शाहू या चौघा जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ यांच्याकडे या प्रकरणाचा चौकस तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news