पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या विविध कारवायांसाठी 2018 मध्ये स्थापन झालेल्या पोलिस ठाण्याकडून कधीही पूर्णवेळ पोलिस उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे महापालिकेला पोलिस ठाण्याचा उपयोग झाला नसला, तरी पोलिसांच्या वेतनाचा भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे पोलिस ठाणे बंद करण्याचा विचार पालिकेकडून सुरू आहे. पोलिस ठाण्याची गरज पडताळून निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
शहरात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्ताची गरज भासते. या बंदोबस्तासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणात शुल्क मोजावे लागत होते. हा खर्च वर्षाला जवळपास साडेचार ते पाच कोटींचा होता. महापालिकेने 2016 मध्ये पोलिस ठाण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. सुमारे 153 पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांची पदे मंजूर झाली.
मात्र, त्यानंतरही कधीही महापालिकेस पोलिसांकडून ही सर्व पदे देण्यात आली नाहीत. या पोलिस ठाण्यात 35 ते 40 कर्मचारीच नियुक्त करण्यात आले. त्यातही अनेक कर्मचारी आजारपण अथवा इतर कारणास्तव रजेवरच असतात. पोलिस ठाणे असतानाही महापालिकेस स्थानिक पोलिस बंदोबस्ताची गरज भासते.
हेही वाचा