ठाणे : मुरबाड तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले | पुढारी

ठाणे : मुरबाड तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : मुरबाड तालुक्याला आज (दि. २६) अवकाळी पावसाने झोडपले असून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

मुरबाड तालुक्यात आज (दि. २६) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्मिती झाली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गडगडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. मुरबाड ग्रामीण व शहरी भागात भात झोडणी व मळणीवर पाणीच पाणी फिरल्याने शेतकरीवर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे. तर जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे तालुक्यातील सायळे गावामध्ये सरस्वती विद्या मंदिर सायले शाळेचे फार मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे की विद्यार्थी उद्या शाळेत कसे बसतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.तर या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सायळे गावातील जवळपास ११ जणांच्या घरावरील मोठ्या प्रमाणात पत्रे उडाल्याने फार मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

नुकसान झालेल्या घरमालकांची नावे पुढीलप्रमाणे दिलीप सूर्यराव, नितीन सुर्यराव, राजेंद्र सूर्यराव, श्रीराम सुर्यराव, सदाशिव पवार, रवींद्र पवार, दौलत गायकवाड, योगेश सूर्यराव, रमेश सूर्यराव, द्वारकानाथ सुर्यराव, प्रसाद सुर्यराव, इंद्राबाई सुर्यराव यांच्यासह अकरा जणांच्या घरावरील मोठ्या प्रमाणात पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.

तालुक्यात ग्रामीण भागात व आदिवासी पट्ट्यात सध्या भाजीपाल्याच्या लागवडीसाठी जमिनीची ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात मशागत सुरू आहे. यावर रविवारी (दि. २६) अवकाळी पाऊस पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची मजागत करावी लागेल असे चित्र दिसून येत आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेतकरी वर्गाला तसेच वीटभट्टीवाल्यांना आणि काही ठिकाणी छोट्या मोठ्या घरावरील पत्रे उडाले अशाप्रकारे अवकाळी पावसाने दणका दिल्याने नुकसान झाल्याचे चित्र समोर येत आहे.

भात कापणीच्या हंगामात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांवर पावसामुळे मोठे संकट कोसळले आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे वीट भट्टी कामगारांची अक्षरशः तारांबळ उडाली.

Back to top button