Maharashtra Politics : पाेलीस म्‍हणतात, ‘उध्दव ठाकरेंना मनाई नोटीस बजावली नाही’ | पुढारी

Maharashtra Politics : पाेलीस म्‍हणतात, 'उध्दव ठाकरेंना मनाई नोटीस बजावली नाही'

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मुंब्र्यातील जमीनदोस्त करण्यात आलेल्या शिवसेना शाखेची पाहणी करण्यासाठी आज (दि.११) सायंकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे येणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यात ठाकरे यांना पोलिसांनी कलम 144 अंतर्गत नोटीस बजावल्याचे वृत्त आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मात्र ठाकरे यांना पोलिसांनी मनाई नोटीस बजावण्यात आली नसल्याचा दावा कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त विलास शिंदे यांनी केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.(Maharashtra Politics)

उध्दव ठाकरेंना नोटीस बजावण्यावरून उडाला गोंधळ…

शिंदे गटाकडून जमीनदोस्त करण्यात आलेल्या शाखेच्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार असून त्यांच्या स्वागताचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लावलेले बॅनर्स फाडण्यात आले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात का यावेसे वाटले नाही, आता एन दिवाळीत ठाकरे मुंब्र्यात येऊन शांतता भंग करण्यासाठी येत आहेत का? असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. तिकडे येऊन जर काही बोलणार असतील तर आम्ही देखील विरोध करणार, मी स्वतः कार्यकर्त्यांसह तिकडे उपस्थित असणार आणि विरोध करण्याचा इशारा म्हस्के यांनी दिला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून मुंब्र्यात १४४ कलम लावण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडले

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. तसेच, शिंदे गटाने नव्याने शाखा बनविण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केले होते. आज उद्धव ठाकरे जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात बॅनर लावले होते. त्यातील ९० टक्के बॅनर फाडल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी याचा एक व्हिडीओ ‘एक्स’ (ट्वीटर) अकाउंटवर शेअर केला आहे. दरम्यान, यापूर्वीच शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक राजन किणे यांना पोलिसांनी १४९ ची नोटीस बजावली आहे. तर उध्दव ठाकरे यांना देखील ठाणे पोलिसांची एकतर्फी नोटीस बजावण्याचे शक्यता आहे.

मुंब्रा येथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस १४४ कमल लागू करण्याची शक्यता आहे. कलम १४४ नुसार मुंब्रा शाखेच्या आसपास १०० मीटर पर्यंत कोणालाही प्रवेश नाही, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमणार आहेत . सोबतच शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील जमणार असल्याने विरोध प्रदर्शन होऊ शकते. त्यामुळे प्रवेश बंदी करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला जशास तसे उत्तर देऊ : नरेश म्हस्के

दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील ठाकरे गटाला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. दिवाळीचा सण आहे, उध्दव ठाकरे कशासाठी येत आहेत? मुंब्रा इथे हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने राहतात, ती शांतता भंग करण्यासाठी उध्दव ठाकरे येत आहेत का, आजपर्यंत त्यांना मुंब्र्यात का यावेसे वाटले नाही. ती शाखा आमची आहे, कायदेशीर रित्या आमच्या ताब्यात आहे, त्यामुळे तिकडे येऊन जर काही बोलणार असतील तर आम्ही देखील विरोध करणार, मी स्वतः कार्यकर्त्यांसह तिकडे उपस्थित असणार, आणि विरोध करणार असा इशारा म्हस्के यांनी दिला आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गटाने लावले बाजुबाजूला बॅनर

शिंदे गटाच्याबॅनर मधून शाखेचे आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या बॅनरमधून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून देखील उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. “त्यांना यायचे तर येऊ द्या आम्ही आमच्या शाखेजवळ उभे राहणार” “स्थानिक राष्ट्रभाईच्या आमदारामुळे आज उद्धव ठाकरे येत आहेत इतकी वर्षे त्यांना आठवण झाली नव्हती”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी राजन किणे यांनी यावेळी दिली.

हेही आहेत 

Back to top button