अपयश जिव्‍हारी! : बाबर आझम पाकिस्‍तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद साेडण्‍याच्‍या तयारीत | पुढारी

अपयश जिव्‍हारी! : बाबर आझम पाकिस्‍तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद साेडण्‍याच्‍या तयारीत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेत पाकिस्‍तान क्रिकेट संघांची ( Pakistan Cricket Team ) कामगिरी निराशाजनक राहिली. पाकिस्तान सध्या चार विजय आणि चार पराभवांसह आठ सामन्यांतून आठ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट +0.036 आहे आणि न्यूझीलंडचा निव्वळ रन रेट +0.743 आहे. या संघाला इंग्लंडविरुद्ध अशक्यप्राय कामगिरी करावी लागणार आहे. त्‍यामुळे संघाचे विश्‍वचषकातील आव्‍हान संपुष्‍टात आल्‍यासारखेच आहे. दरम्‍यान,बाबर आझम ( Babar Azam )भारतातून परतल्यानंतर  मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडू शकतो, असे वृत्त पाकिस्तानमधील जिओ न्यूजने दिले आहे.

Babar Azam : निकटवर्तीयांशी चर्चा करुन बाबर निर्णय घेणार

पाकिस्‍तानमधील पाकिस्तानी जिओ न्यूजच्या वृत्तानुसार,’जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, काही जवळच्या सहकाऱ्यांनी बाबरला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला आहे.बाबर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष रमीझ राजा यांच्‍यासह निकटवर्तीयांशी चर्चा करत आहेत. पाकिस्‍तानच्‍या कर्णधारपदी कायम राहण्याचा बाबरचा निर्णय संबंधितांशी चर्चा केल्‍यानंतरच ठरणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या साखळी फेरीतील पाकिस्तानच्या शेवटच्या सामन्यापूर्वी बाबरला विचारण्यात आले की, तो कर्णधारपदाचा निर्णय कधी घेणार? यावर तो म्हणाला, ‘आम्ही एकदा पाकिस्तानला परतलो की कर्णधारपदाबद्दल काय होते ते पाहू. तथापि, मी सध्या यावर लक्ष केंद्रित करत नाही. माझे लक्ष पुढील सामन्यावर आहे.

‘गेल्या तीन वर्षांपासून मी पाकिस्‍तानचा कर्णधार आहे. मी विश्वचषकात जशी कामगिरी करायला हवी होती तशी कामगिरी केली नाही. त्यामुळे माझ्यावर दबाव आहे, असे लोक म्हणत आहेत. मी कोणत्याही दबावाखाली नाही. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून मी हे करत आहे, असेही त्‍याने नमूद केले होते.

विश्वचषक स्पर्धेत बाबरच्‍या आठ डावात २८२ धावा

बाबरने यंदाच्‍या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत आठ डावांत 282 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. अव्वल फळीतील खराब कामगिरीचे परिणाम पाकिस्तान संघाला भोगावे लागले. भारताविरुद्ध आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर बाबरवर त्याच्या देशात बरीच टीका झाली होती. काही माजी क्रिकेटपटूंनी त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्याचवेळी पीसीबीचे विद्यमान अध्यक्ष झका अश्रफ यांच्याशीही चर्चा थांबल्याचे वृत्तही होते. आता तो केवळ वन डे क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देतो की तिन्ही फॉरमॅटमधून राजीनामा देतो याकडे पाकिस्‍तानमधील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button