ठाणे: अखेर ‘त्या’ बालिकेची मृत्यूशी झुंज संपली; पलावा गृहसंकुल परिसरावर शोककळा

file photo
file photo
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या पलावा गृह संकुलातील बहुमजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणारी चार वर्षांची अवनी पाठक ही बालिका खिडकीतून खाली कोसळली. खिडकीला जाळ्या नसल्याने शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अवनीवर डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रविवारी या बालिकेने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर अवनी राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी संध्यकाळी अवनी आपल्या घरातील सोफ्यावर चढून तेथून उघड्या खिडकीत गेली. खिडकीला बाहेरून लोखंडी जाळ्या नव्हत्या. खिडकीत गेल्यानंतर तोल जाऊन ती पाचव्या मजल्यावरून पहिल्या माळ्यावर असलेल्या शेडवर आदळली. वरून काहीतरी जोरात पडल्याचा आवाज झाला. पहिल्या मजल्याच्या शेडवर पडलेल्या अवनीला वाचविण्यासाठी त्याच इमारतीतील रहिवासी रावत डिसोझा पुढे आले. शेडवरून जात असताना शेड तुटल्याने तेही तळ मजल्यावर आदळले. काचा लागल्याने रावत यांनाही गंभीर दुखापत झाली.

इमारतीतील रहिवाशांनी अवनीला शेडवरून खाली आणले आणि तिच्यासह रावत यांनाही डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले. जखमी रावत यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. अवनीला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सुरूवातीला ती उपचारांना प्रतिसाद देत होती. मात्र रविवारी सकाळी तिची प्रकृती चिंताजनक झाली. अखेर उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देणाऱ्या अवनीला तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची मानपाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news