ठाणे : कल्याणच्या नांदिवलीतील भूमाफियांच्या ठेचल्या नांग्या | पुढारी

ठाणे : कल्याणच्या नांदिवलीतील भूमाफियांच्या ठेचल्या नांग्या

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 9/आय प्रभागात मोडणाऱ्या नांदिवलीतील भूमाफियांच्या नांग्या ठेचण्यात आल्या. सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकामे करणाऱ्या या भूमाफियांनी उभारलेल्या बैठ्या चाळीतील 8 खोल्यांसह 12 जोते व 3 गाळे भुईसपाट करून टाकण्यात आले.

केडीएमसी आयुक्त‍ डॉ. भाऊसाहेब दांडगे व अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली. 9/आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना खबर मिळाली होती. कल्याण पूर्वेकडील नांदिवली तलावाजवळ असलेल्या गुरूचरण जागेवर अवैधरित्या बांधकामे सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी मोठ्या फौजफाट्यासह कारवाई सुरू केली. तेथील बैठ्या चाळीच्या 8 खोल्या, 12 जोते व 3 दुकानी गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई केली.

जेसीबीच्या साह्याने ही कारवाई करत अनधिकृत बांधकाम नियंत्रण व फेरीवाले पथकातील कर्मचारी, स्थानिक पोलीस, तहसिलदार, अपर मंडळ अधिकारी, तलाठ्यांसह काटेमानिवली, हेदुटणे, दावडी, निळजे, नेतीवली आणि तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत संयुक्तरित्या करण्यात आली. पोलिसांसह सरकारी फौजफाट्यामार्फत कारवाई करण्यात येईल असल्याची आगाऊ खबर कळताच ही बांधकामे करणाऱ्या भुमाफियांनी या भागातून आधीच पळ काढला होता. मात्र सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकामे करणाऱ्या या भूमाफियांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात आले.

Back to top button