‘ठाणे जि. प. प्रशासकीय इमारत बांधकाम लवकरच सुरू होणार’ | पुढारी

'ठाणे जि. प. प्रशासकीय इमारत बांधकाम लवकरच सुरू होणार'

मुरबाड - बाळासाहेब भालेराव

ठाणे जिल्हा परिषदेची पूर्वीची इमारत अतिशय जुनी व जीर्ण झाल्याने ही इमारत निष्कालीतत करून नवीन प्रशासकीय प्रशस्त अशी इमारत व्हावी, अशी सर्वच लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी होती. त्या अनुषंगाने मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात सन २०१७ मध्ये बैठक आयोजित करून मागणी व सतत पाठपुरावा केला होता. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण व दत्तात्रय गीते यांनी सुद्धा पाठपुरावांमध्ये सातत्य ठेवून मोठे सहकार्य केलेले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद ठाणे नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास १७ ऑगस्ट २०२२ रोजी प्रशासकीय मंजुरी व दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ रोजी तांत्रिक मान्यता आदेश मिळालेले आहेत, अशी माहिती मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी बोलताना दिली आहे.

संबंधित बातम्या –

जिल्हा परिषद ठाणे (जि. ठाणे) येथे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम १९६५-६६ मध्ये झालेले आहे. जिल्हा परिषद लोकल बोर्डाकडून हस्तांतरीत झालेली आहे. मुख्य इमारत व बाजुची एक इमारत ५० वर्षापेक्षा जास्त जुनी व जीर्ण झाली असल्याने संरचना परिक्षण अहवालानुसार इमारत धोकादायक आहे. इमारत निर्लेखन करण्याचे अहवालामध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे ही इमारत निर्लेखित करून सध्यस्थितीत जिल्हा पररिषदेचे एकूण १५ विभागांपैकी ५ विभाग हे जिल्हा परिषद मुळ आवारात व आरोग्य विभागामध्ये तर ७ कार्यालय ही जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कार्यरत असून ३ कार्यालये विखुरलेल्या स्वरूपात कार्यरत आहेत.

जिल्हा परिषद ठाणे नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासा शासन निर्णय क. जिपई / २०१७ / प्र.क. १९८/ बांध – ४ अन्वये दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी एकण ७३ कोटी २५ लक्ष ३७ हजार रुपयांच्या किमतीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली असून यामध्ये इमारत बांधकामासाठी सुमारे ६३ कोटी रूपये तर १० कोटी रूपये हे सुशोभिकरण, फर्निचर, गार्डनिंग, अंतर्गत रस्ते, विद्युत व्यवस्था व त्याअनुषंगाने येणा-या इतर कामांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद ठाणे नवीन प्रशासकिय इमारत बांधकाम बेसमेंट, तळमजला आणि एकूण ११ मजल्यांचे असे २०१७६.२७ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम होणार आहे.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी मुरबाड येथे आमदार किसन कथोरे सदिच्छा भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून इमारतीचे बांधकाम तातडीने करण्याबाबत काय करता येईल? अजुन काही नवीन कल्पना व सूचना असतील तर त्या द्याव्यात, असा सल्ला घेऊन मुरबाड मतदार संघातील पंचायत समिती कार्यालय, अंबरनाथ पंचायत समिती कार्यालय व काही विकास कामांना भेटी दिल्या.

जिल्हा परिषद ठाणे येथील नवीन प्रशासकिय इमारतीच्या तातडीने निविदा काढण्याबाबत आमदार किसन कथोरे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग यांना भेटणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

Back to top button