ठाणे: भिवंडीत ५५ लाखांची विदेशी दारू जप्त | पुढारी

ठाणे: भिवंडीत ५५ लाखांची विदेशी दारू जप्त

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या ठाणे युनिटने भिवंडी तालुक्यातील अनगाव, वाडा रोड येथे एका कॉम्प्लेक्सवर छापा मारून महागड्या विदेशी वाईनचा साठा जप्त केला. यावेळी विदेशी वाईनचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

जप्त करण्यात आलेल्या वाईनसाठ्याची किंमत 55 लाख 22 हजार 400 रुपये इतकी आहे. रमेन्द्रकुमार रमाकांत तिवारी (वय 48, गणेश नगर, शेलार गाव, भिवंडी) आणि रियाज अली आबिद (55, म्हाडा कॉलनी, नंदीनाका, भिवंडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
भिवंडीतील अनगाव, वाडा रोड येथील धवांनी कॉम्प्लेक्स येथे तीन गाळ्यांमध्ये बेकायदेशीर महागड्या विदेशी वाईनचा साठा करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी रात्री सदर कॉम्प्लेक्सवर छापा मारला. यावेळी गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी वाईनचा साठा आढळून आला. पथकाने 750 मिलींच्या 5 हजार 288 महागड्या वाईनच्या बॉटल्स घटनस्थळावरून जप्त केल्या. पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button