ठाणे : कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून २५ कोटी लांबवले

ठाणे : कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून २५ कोटी लांबवले
Published on
Updated on

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : एका पेमेंट गेटवे कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करुन २५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी 'सेफएक्सपे' या कंपनीच्या कायदेशीर सल्लागार मनाली साठे यांच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात २६० संशयास्पद बँक खात्यात तब्बल १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२ हजार ४९७ रूपयांची आर्थिक उलाढाल केली असल्याचे आढळून आले आहे.

संबंधित बातम्या : 

ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात कार्यालय असलेल्या सेफक्सपे या पेमेंट गेटवे कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून काही अज्ञात सायबर चोरट्यांनी कंपनीच्या खात्यातून तब्बल २५ कोटी रुपये वळते केले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच या घटनेचा तपास सायबर सेलच्या पथकाने आपल्या हाती घेतला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना २५ कोटी फसवणुकीच्या रकमेपैकी १ कोटी ३९ लाख १९ हजार २६४ एवढी रक्कम ही रियाल इंटरप्राइजेस नाव असलेल्या बँक खात्यामध्ये वळती झाल्याचे प्रथमदर्शनी सायबर सेलच्या पथकास आढळून आले. रियाल इंटरप्राइजेसचे कार्यालय वाशी व बेलापुर, नवी मुंबई येथे असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानंतर रियाल इंटरप्राईजेस यांच्या वाशी व बेलापूर येथील कार्यालयावर सायबर पोलिसांनी छापा मारून विविध बँक खाते व विविध करारनामे जप्त केले आहेत. त्यात नौपाडा पोलीस ठाणे यांच्या हद्दीमध्ये बालगणेश टॉवर स्टेशन रोड ठाणे या पत्त्यावर विविध व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे पाच भागीदारी संस्था स्थापन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच रियाल कंपनीचे जवळपास २६० बँक खाते व विविध नोटराईज्ड भागीदारी करारनामे आढळून आले आहेत. पोलिसांना मिळून आलेल्या बँक खात्याच्या पडताळणीतून या सर्व खात्यात तब्बल १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२ हजार ४९७ रूपयांची आर्थिक उलाढाल केली असल्याचे आढळून आले आहे. या रकमेपैकी काही रक्कम परदेशात पाठवल्याचे देखील पोलीस तपासातून समोर आले आहे.

अनेक फ्रॉड समोर येण्याची शक्यता

अज्ञात सायबर चोरट्यांच्या टोळीने देशभरातील अनेक बड्या कंपन्यांचे अशाच प्रकारे सॉफ्टवेअर हॅक करून मोठा आर्थिक अपहार केल्याचे या प्रकरणाच्या तपासातून समोर येत आहे. या टोळीने विविध अनोंदणीकृत भागीदारी फर्म तसेच विविध इसमांचे नावे बँक खाती उघडून खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणुकीची रक्कम शेकडो खात्यात वळती केल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्याच्या तपासात संजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमन, केदार उर्फ समीर दिघे, जितेंद्र पांडे, नवीन इत्यादी व्यक्तींची नावे समोर आली असून यांचे विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात अन्य एक स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news