ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला | पुढारी

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कारवाई करायला गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली आहे. अतिक्रमण विभागाच्या गाड्यांवर फेरीवाल्यांकडून अक्षरशः दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर फेरीवाल्यांच्या या हल्ल्यात पालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. पालिकेकडून यासंदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असल्याची माहिती वागळे प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेंद्र भोईर यांनी दिली आहे.

ठाण्यात फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा आपली दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न वागळे परिसरात घडलेल्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. वागळे इस्टेट परिसरातील रोड नं १६ या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरु होती. कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहने निघाली असताना फेरीवाल्यांकडून अचानक मोठ्या गाडीवर दगड मारण्यात आला. यामध्ये या गाडीची काच फुटली. प्रसंगावधान राखत गाडीच्या चालकाने गाडी सोडून त्या ठिकाणाहुन पळ काढला. तर फेरीवाल्यांकडून आणखी एका वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे.

ही घटना घडल्यानंर उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त महेंद्र भोईर यांनी यासंदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फेरीवाल्यांकडून यापूर्वी देखील अशाप्रकाचे हल्ले करण्यात आले असून यापूर्वी कासारवडवली या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात तत्कालीन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची अक्षरशः बोटे छाटण्यात आली होती. त्यामुळे या हल्ल्यानंतर पालिका आयुक्त फेरीवाल्यांवर कशाप्रकारची कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पावत्या फाडूनही कारवाई का ?

हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांनी पालिकेच्या या कारवाईचा विरोध केला असून कोणत्याही तरी महिलेने काढलेल्या व्हिडीओच्या आधारे पालिकेने ही कारवाई केली असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून करण्यात आला आहे. पालिका जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा आम्ही या ठिकाणी बसत नाही. आमच्याकडून पावत्याही फाडल्या जातात . पालिकेचे कोणत्याही प्रकारची सूचना न देता ही कारवाई करण्यात आली असल्याचे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे.

Back to top button