नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या अधीनस्थ शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्यसंस्था, सार्वजनिक आरोग्य सेवा, शिक्षक अशा जवळपास सर्वच संवर्गातील राज्यभरातील कर्मचारी आजपासून (दि.१४) बेमुदत संपावर असल्याने शासकीय यंत्रणा पुरती कोलमडल्याचे चित्र आहे. नागपुरसह विभागात आणि विदर्भात अशीच स्थिती आहे. या संपाच्या निमित्ताने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. विविध कामासाठी आलेल्यांना आल्या पावली परतावे लागत आहे. विशेष म्हणजे आरोग्य व्यवस्थेवरही याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
परीक्षा काळात सुरू झालेल्या या बेमुदत संपात शिक्षकही सहभागी झाले असले तरी १० वी, १२ वी च्या परीक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हा संप अवैध ठरवित संपकऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनातर्फे देण्यात आला आहे. मात्र, त्याचा कोणताही परिणाम संपकऱ्यांवर दिसत नाही. जिल्हास्तरावर कर्मचाऱ्यांनी धरणे, सभांचे आयोजन केले.
नागपुरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बहुतांश शस्त्रक्रिया स्थगित कराव्या लागल्या. अत्यावश्यक शास्त्रक्रियाच तेवढ्या होत आहेत. रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप रुग्ण व नातेवाईकांचा आहे. प्रशासनाकडून परिचारिका महाविद्यालयांतील विद्यार्थी, निवासी व आंतरवासिता डॉक्टरांसह इतरही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध वार्डांमध्ये सेवा लावल्या आहेत.
माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन संपात जाण्याऱ्या शिक्षकांना प्राचार्यांकडून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जात आहे. सकाळच्या पाळीतील काही शिक्षकांनी मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना जुन्या पेन्शनच्या मागणीचे निवेदन देत संपावर जाण्याचा इशारा दिला. मुख्याध्यापकांडून कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असतानाही अनेक शिक्षक आज बिनधास्तपणे रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसले.
हेही वाचा :