नाशिक/ पंचवटी/दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
कांदा, कोथिंबीर, द्राक्षपिकांच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी माकपच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी काढलेला लाँगमार्चने सोमवारी (दि.१३) शहरातून मुंबईकडे कूच केले. यावेळी निमाणी चाैकामध्ये आंदाेनलकर्त्या शेतकऱ्यांनी कांदा व भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध नोंदविला. तत्पूर्वी रविवारी (दि.१२) दुपारी दिंडोरीमधून मोर्चाला प्रारंभ झाला. रात्री उशिरा हा मोर्चा म्हसरूळ परिसरात मुक्कामी पोहोचला. दरम्यान मागण्यांबाबत उद्या दुपारी ३ वाजता मुंबईत मुख्यमंत्र्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे (मार्क्सवादी) नाशिक ते मुंबई, असा लाँगमार्च काढला आहे. माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चाचा प्रारंभ रविवारी (दि.१२) दिंडोरी येथून करण्यात आला आहे. मोर्चात हजारो महिला व पुरुष सहभागी झाले. रात्री म्हसरूळ परिसरातील मुक्काम केल्यानंतर सोमवारी (दि.१३) सकाळी १० ला मोर्चास प्रारंभ झाला. दिंडोरी राेडमार्गे नाशिक बाजार समितीपर्यंत मोर्चा येताच मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. निमाणी चाैकात शेतमाल फेकत शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी गावित व मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. म्हसरूळ, दिंडोरी रोड, मुख्य बाजार समिती, दिंडोरी नाका, काट्या मारुती चौक, संतोष टी पॉइंटमार्गे द्वारका, मुंबई नाक्यामार्गे मार्गस्थ झाला. रात्री उशिरा सारूळ गावापुढील मैदानात हा मोचार् मुक्कामी पोहोचला. माेर्चामध्ये डॉ. डी. एल. कराड, माकपचे जिल्हा सचिव रमेश चौधरी, सावळीराम पवार, मोहन जाधव यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी व हजारो शेतकरी सहभागी झाले. मोर्चासोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे.
लक्षणीय सहभाग, लाल झेंडा
तळपत्या उन्हातही कसलीच तमा न बाळगता लॉंगमार्चमध्ये पुरुषांसह महिलांचाही सहभाग लक्षणीय दिसून आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह असलेले लाल झेंडे, किसान सभा लिहिलेल्या लाल रंगाच्या गांधीटोप्या परिधान केलेले शेतकरी बांधव यामुळे रस्ते लाल रंगाने भरून निघाले होते. हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झालेले असतानाही शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा मार्गक्रमण करत होता. येत्या २३ तारखेला हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे.
मध्यस्थी अयशस्वी
पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (दि.१२) रात्री उशिराने जिल्हाधिकारी कार्यालयात माेर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेत चर्चा केली. तसेच नाशिकमध्ये मोर्चा थांबविण्याची विनंती केली. पण यावेळी चर्चा निष्फळ ठरली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही जे. पी. गावित यांच्याशी फोनवरून संपर्क साधत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळात मागण्यांबाबत निर्णय घेतल्याशिवाय मोर्चा थांबणार नाही, अशी भूमिका गावित यांनी घेतली.
वाहतूक कोंडी अन् आठवण
माकपाने काढलेला मोर्चा हा नाशिक शहरातील विविध भागांमधून मार्गस्थ झाला. मोर्चात सहभागी नागरिक व वाहनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नाशिककरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. यापूर्वी २०१८ मध्येही विविध मागण्यांसाठी माकपाने नाशिक ते मुंबई असा लाँगमार्च काढला होता. त्यावेळच्या सरकारने मोर्चेकऱ्यांपुढे झुकत मागण्या मान्य केल्या होत्या. नाशिककरांच्या त्या मोर्चाच्या आठवणींना आजच्या मोर्चाच्या निमित्ताने उजाळा मिळाला.
प्रमुख मागण्या अशा…
– जमीन कसणाऱ्यांच्या नावे करून सातबारावर नाव लावावे
– अपात्र जमीन दाव्यांची पूर्तता करून दावे पात्र करावेत
– प्रत्येक मंजूर प्लॉटधारकासाठी विहीर, सोलर वीजपंप, पाइपलाइन,
– जमिनीचे सपाटीकरण, फळबाग, लागवडसारख्या केंद्र सरकारच्या योजना राबवाव्या.
– गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्या
– ज्या गायरान जमिनीवर घरे आहेत ती घरे नियमित करावी
– प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान १.४० लाखांहून पाच लाख रुपये करावे
-वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्व्हे करून त्यांची नावे ड यादीत समाविष्ट करावे.
– नारपार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प रद्द करून सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांना छोटे-मोठे सिमेंट काँक्रीटचे बंधारे, पाझर तलाव, लघु पाटबंधारे यासारख्या योजना घेऊन प्रथम पुरेसे पाणी स्थानिकांना द्यावे.
– शेतकऱ्यांच्या कांदा, द्राक्ष व इतर शेतीपिकांना हमीभाव मिळावा
-लाल कांद्याला सहाशे रुपये अनुदान जाहीर करून कांदा निर्यातीचे धोरण जाहीर करावे
मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत मंगळवारी (दि.१४) बैठक आयोजित करण्यात आल्याचा पालकमंत्र्यांचा निरोप मिळाला आहे. बैठकीस आमचे १५ जणांचे शिष्टमंडळ उपस्थित राहील. तोपर्यंत हा मोर्चा पुढे मार्गस्थ होत राहील. – जे. पी. गावित, माजी आमदार.
फलकांनी वेधले लक्ष
विविध मागण्यांचे फलक हाती घेत नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. 'कांद्याला हमीभाव द्या; एकच मिशन जुनी पेन्शन; शेतीसाठी थ्री-फेज लाइट १२ तास द्यावी; बोगस हटाओ, आदिवासी बचाओ; शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेच पाहिजे; अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांना भरपाई द्यावी; वनजमिनींचा स्वतंत्र सातबारा करा; अंगणवाडी, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी अशा विविध मागण्यांच्या फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पालकमंत्री दादा भुसे यांचा निरोप घेऊन मी येथे आलो आहे. मंत्रालयात मंगळवारी (दि.१४) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मागण्यांबाबत बैठक बोलविण्यात आल्याचे ना. भुसे यांनी सांगितले आहे. मोर्चात सहभागी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना हा निरोप देण्यात आला. – गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक.